जय जय रघुवीर समर्थ. निर्मळ, निश्चळ, निराभास याला दृष्टांत द्यायचा तर आकाशाचा द्यावा लागेल. आकाश म्हणजे अवकाश, मोकळी जागा. आधी मोकळी जागा मग पदार्थ त्याचा अनुभव घेतल्यावर ती मग बोलावा. अनुभवाशिवाय सगळं काही व्यर्थ आहे. ब्रह्म म्हणजे निश्चळ. आत्मा म्हणजे चंचळ. त्याला दृष्टांत हा वायूचा देता येईल. घटाकाश हा ब्रम्हाचा दृष्टांत आहे. घटबिंब हा आत्म्याचा दृष्टांत आहे. दोन्हीचे विवरण केले असता ते भिन्न आहेत. जितकी भूते निर्माण झाली तितकी नष्ट झाली. चंचल आले आणि गेले असं जाणावे. अविद्या जड आहे, आत्मा चंचल आहे, कापूर जड आहे. आत्मा म्हणजे अग्नी दोन्हीही जळून तात्काळ विरून जातात. ब्रम्ह आणि आकाश निश्चळ आहे. आत्मा आणि वायू चंचळ आहेत.
परीक्षा घेणाऱ्यांनी परीक्षा करावी, खरं की खोटं ते पाहावं. जड वस्तू अनेक आहेत. आत्मा एकमेव आहे. असा आत्मा-अनात्मा विवेक आहे. जगाचे पालन करणारा त्याला जगन्नाथ म्हणावे. जड अनात्मा आत्म्याला चेत्वतो. सगळीकडे जो आढळतो तो सर्वात्मा. सर्व मिळून चंचलात्मा तयार होतो. निश्चय नव्हे. निश्चळ म्हणजे परब्रम्ह. तिथे दृश्यभ्रम नाही. विमल ब्रह्म भ्रमशून्य आहे. आधी आत्मानात्मविवेक करावा. मग सारासार विचार करावा. प्रकृतीचा संवाद होतो हे लक्षात घ्यावं. विचार केला तर प्रकृतीचा संहार होतो, दृश्य नष्ट होतात, अध्यात्मश्रवण केले असता अंतरात्मा मात्र निर्गुण असल्याचे स्पष्ट होते. चढता विचार केला तर अंतरात्मा चढत जातो, उतरता विचार केला तर तो भूमंडळावर उतरतो. अर्थ असतो तसा आत्मा होतो. जिकडे नेला तिकडे जातो. अनुमान केल्यावर त्याच्याविषयी काहीसा संदेह निर्माण होतो. निस्संदेह असा अर्थ घेतला तर आत्मा निसंदेह झाला. जसे अनुमान करावे तसा होतो. त्याचा नवरसिक असा अर्थ घेतला तर श्रोते तद्रूप झाले, आश्चर्य म्हटले तर सर्व आश्चर्यचकित झाले.
सरड्याचे रंग बदलतात त्याप्रमाणे याच्यात बदल होतो, म्हणून माणसाने उत्तम मार्ग धरावा. उत्तम अन्न म्हटलं तर त्याची आठवण होऊन मनात त्याचा आकार येतो. स्त्रीचे लावण्य वर्णन केले की मग तिथेच बसते. पदार्थाचे वर्णन किती म्हणून सांगायचं? मनाला समजवायचं हो की नाही. जे जे पाहिलं आणि ऐकलं ते मनामध्ये ठाम बसल. परीक्षावंताने हित, अहित ओळखले. त्यामुळे सर्व सोडून एका परमेश्वराला धुंडाळाव. मग काहीतरी महत्वाचे तुम्हाला मिळेल. देवाने नाना सुखे केली त्यामुळे लोक त्याच्यामध्ये चुकली आणि जन्मभर चुकतच गेली. सर्व सोडून मला शोधा असं देवच बोलला. लोकांनी भगवंताचा तो शब्द मात्र अमान्य केला म्हणून त्यांना नाना दुःख भोगांवी लागतात. सर्व काळ कष्टी होतात. मनाला सुख व्हावं अशी इच्छा वाटते पण ते कसं मिळणार? ज्याच्यासाठी उदंड सुख आहे ते वेडे सुद्धा त्याच्यात गुरफटून गेल्यामुळे सुख सुख म्हणून ते दुःख भोगून मरण पावले. शहाण्याने असे करू नये. सुख होईल असंच करावं.
देवाला ब्रह्मांडापर्यंत शोधत जावं. मुख्य देवच शोधला तर मग त्याला काय कमी पडणार? पण लोक विवेक सोडून जातात. विवेकाचे फळ म्हणजे सुख. अविवेकाचं फळ म्हणजे दुःख. याच्यामध्ये जे आवश्यक आहे ते केलं पाहिजे. कर्त्याला ओळखावं त्यालाच विवेक म्हणावं. विवेक सोडला तर अत्यंत दुःखी व्हाल. असो. कर्त्याला ओळखावं आपलं हित साधण्यात चतुर माणसाने चुकू नये. असा उपदेश समर्थ देत आहेत. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे प्रत्यय निवारण नाम समास सप्तम समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127