जय जय रघुवीर समर्थ. ज्याला पंचमहाभूते म्हणतात त्यांची नावे अभ्यासावी. त्यानंतर अनुभव घेऊन त्यांची रूपे जाणावी. यामध्ये शाश्वत कोण आणि अशाश्वत कोण? याचं अनुभव घेऊन विवरण करावे. पंचमहाभूतांचा विचार करावा. तेच मी सारासार सांगतो ते सावधपणे ऐका. पृथ्वी-आप-तेज-वायू-आकाश ही नावे सावकाश बोललो. आता त्याचं रूप कस आहे ते ऐका. पृथ्वी म्हणजे धरणी, आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी किंवा सूर्य, वायू म्हणजे वारा, आकाश म्हणजे सगळं अवकाश. आता याच्यापैकी शाश्वत काय? त्याचा मनामध्ये विचार करा.
एक शीत चाचपले की भाताची परीक्षा होते त्याप्रमाणे थोडक्या अनुभवावरून पुष्कळ काही जाणावे. पृथ्वी रचते आणि खचते हे अनुभवाला येते. सृष्टीमध्ये नाना रचना होते आणि जाते. पाणी ते सुद्धा आटून जातं. तेज प्रगट होतं आणि विझत. वारेसुद्धा येतात आणि जातात. आकाश अवकाश नाममात्र आहे. विचार केला तर तेही राहत नाही. अशाप्रकारे पंचभुते आहेत. ते कायम राहतात असं होत नाही. असा पाच भूतांचा विस्तार नाशवंत आहे हे निश्चित. शाश्वत आत्मा हा निराकार सत्य जाणावा. तो आत्मा कोणाला कळत नाही. ज्ञानाशिवाय समजत नाही; म्हणून संत सज्जनांना विचारावे. सज्जनांना विचारल्यावर ते म्हणतात की अविनाशी आत्म्याला जन्म मृत्यू हे बोलूच नये.
निराकार आहे त्याला आकार असल्याचे भासते आणि आकार असलेले निराकार भासते. निराकार आणि आकार कोणता ते विवेकाने ओळखावे. निराकार नित्य आहे, आकार अनित्य आहे. याला म्हणतात नित्यानित्य विचारणा. सारामध्ये असार भासते आणि असार हे सार असल्यासारखं वाटतं. सारासार विचार शोधून पहावा. पंचभौतिक आहे ते माईक आहे परंतु ते अनेक असल्यासारखं भासत आणि आत्मा एक आहे तो सर्वत्र व्यापून आहे. चार भुतांमध्ये गगन जस आहे, त्या गगनासारखं सगळं नीट विचारपूर्वक पाहिल असता आकाश आणि वस्तू अभिन्न आहे. आकाशाला फक्त उपाधी आहे. उपाधी नसेल तर तेही निराभास होईल. जे निराभास, अविनाशी आहे तसं गगन आहे. आता हे वर्णन असू द्या. परंतु जे पाहिल्यावर नष्ट होत नाही ते अनुमान करून विवेकपूर्वक जाणावे.
परमात्मा हा निराकार आहे हा विचार महत्त्वाचा आहे आणि आपण कोण हा विचार पाहिला पाहिजे. देहाचा अंत झाल्यावर वायू निघून जातो, हे खोटं म्हटलं तरी मग श्वासास्वास पहा. आपल्याला श्वासोछ्वास करावा लागतो, त्यामुळे ते खोटं म्हणता येत नाही. श्वास कोंडला गेला तर देह पडतो. देह पडला की त्याला मढे म्हणतात. त्या मढ्याला कधी काही कर्तृत्व नसतं. देहापासून वायू वेगळा करू नका, वायूपासून देह वेगळा करू नका. विचार पाहिला तर दोन्ही एकाशिवाय दुसरा काही करू शकत नाही. शांतपणे पाहिलं तर मनुष्य दिसतो, विचार केला तर काहीच दिसत नाही. हे अभेदभक्तीच लक्षण आहे, असं ओळखावं. कर्ता आपण असं म्हणावं तर आपल्या इच्छेप्रमाणे व्हायला पाहिजे. इच्छेसारखं होत नसेल तर सगळेच खोटे आहे असं म्हणावं. म्हणून आपण कर्ता नाही. मग भोक्ता कसचा, कोण? हे विचाराच लक्षण आहे अविचारामुळे समजणार नाही. विचार आणि अविचार हा प्रकाश आणि अंधकारासारखा आहे. विकार आणि निर्विकार एक नाही. जिथे विवंचना नाही तिथे काहीच चालत नाही, जे खरं आहे ते अनुमानामध्ये कधी येत नाही. प्रत्ययाला येते त्याला न्याय म्हणायचं ज्याचा प्रत्यय येत नाही तो अन्याय. जात्यंध व्यक्तीला नाना रत्नांची परीक्षा कशी होईल? म्हणून जाणणारा धन्य आहे. तो निर्गुणाला अनन्यपणे भजतो. आत्मनिवेदन करून परमपुरुष बनतो. असं समर्थ सांगत आहेत. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे लघुबोधनाम समास षष्ठ समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127