जय जय रघुवीर समर्थ. जे आपल्या अनुभवाला येत नाही ते तर्काने जाणू नये. प्रत्ययाशिवाय सर्व लोकांना पर्याय नाही. व्यवसाय, प्रकृती, प्रवृत्ती, निवृत्ती दोन्हीकडे प्रचिती पाहिजे. प्रचितीशिवाय नुसता तर्क हा विवेकहीन आहे. असा सृष्टी रचनेचा विचार. थोडक्यात हा प्रकार सांगितला. आता विस्ताराचा संहार किंवा संहाराचा विस्तार तोही ऐका मुळापासून शेवटपर्यंत. सगळं आत्मारामच करीत असतो. याचे योग्य विवरण करतो. पुढे संहार सांगत आहे तो श्रोत्यानी ऐकला पाहिजे. एवढ्यावरच हा समाज पूर्ण झाला. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे उभारणी निरूपण नाम समास तृतीय समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक 13 समास चार प्रलय नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. पृथ्वीचा अंत होईल. कल्पांत माजेल. अशा प्रकारचा समाचार शास्त्रामध्ये सविस्तरपणे वर्णन केलेला आहे. शंभर वर्षे दुष्काळ पडेल त्यामुळे सगळी सृष्टी जळेल. मोठमोठे पर्वत मावतील इतकी भूमी तडकेल. बारा वर्ष सूर्य मंडळाच्या किरणांपासून ज्वाला निघतील, त्याच्यामुळे शंभर वर्ष सगळ्या पृथ्वीचे दहन होईल. सगळी पृथ्वी शेंदरी रंगाची होईल. ती पोळल्याने कळवळून विष बाहेर टाकेल. त्या विषाच्या ज्वालांनी सगळे पाताळ जळतील. महाअग्नीत पाताळ भस्म होईल. मग तिथे महाभुत खवळतील. प्रलयाचे वारे सुटतील. प्रलयाचे अग्नी चहूकडे वाढतील. प्रलयकाळी अकरा रुद्र खवळतील, बारा सूर्य कडकडतील, सर्व अग्नी एकत्र होईल. अशा ते वारे पण वाटतील त्याकाळी किती वीरांचे तडाखे बसतील नंतर पृथ्वी सगळी तडकायला लागेल. सगळीकडे कठीण परिस्थिती निर्माण होईल.
सर्व पडेल तिथे डोंगरांची कोण गणना करील? कोण कोणाला सांभाळेल? चंद्र सूर्य तारांगण सगळे वितळून एकवटतील. पृथ्वीचे काठिण्य नष्ट व्हायला लागेल आणि सगळी धगधग निर्माण होईल. ब्रम्हांडभर झालेल्या अग्नीच्या भट्टीमध्ये पृथ्वी जळून जाईल. जळून भस्म निर्माण होईल. त्याच्यानंतर महावृष्टी होउन पाण्यामध्ये पृथ्वी बुडून जाईल. भाजलेला चुना जसा पाण्यामध्ये विरतो तशी पृथ्वी तात्काळ त्याच्यामध्ये विरेल आणि जगामध्ये पाण्यामध्ये ती मिसळून जाईल. शेष, कूर्म, वराह जातील, सगळ्या पृथ्वीचा आधार तुटेल. असेल ते पाण्यात मिळून जाईल. मग प्रलयमेघ जोरदार घोष करतील. अखंड विजा कडकडतील. मोठा आवाज होईल. पर्वताप्रमाणे मोठ्या गारा कोसळतील. पर्वत उडून जाईल असा वारा वाहील. इतका घनदाट अंधार होईल की त्याला कशाची उपमाच देता येणार नाही. सर्व समुद्र आणि नद्या एकत्र येऊन जणू आकाशातून कोसळू लागतील. दोन धारांमधील पोकळी राहणार नाही अखंड धार बरसू लागेल. मग मत्स्य कूर्म सर्प पडतील, एखाद्या पर्वतासारखी त्यांची रास होईल. गर्जना करीत पाण्यात पाणी मिसळत राहील. सप्त सिंधू मर्यादा सोडतील. खवळलेल्या पाण्यातून अग्नी जन्माला येईल.
ब्रह्मांडा सारखा तप्त लोह पृथ्वीच्या जलाचा समूह शोषु लागेल. पाण्याची स्थिती अपूर्व होईल. पाणी आटून जाईल. असंभाव्य अग्नी माजेल. त्या अग्नीला प्रलयवात भेटेल. तो त्याला वेढून घेईल. पदराने वारा घातल्यानंतर जसा दिवा विझतो त्याप्रमाणे वायू असंभाव्य प्रबळ होईल. उदंड पोकळी मध्ये थोडा वारा शिरताच त्याच्यामध्ये सगळा पंचमहाभूतांचा पसारा वितळून जाईल. महद्भूत मूळमाया विस्मरण होऊन काया वितळून जाईल. कोणत्याही पदार्थाला राहायला जागा राहणार नाही. सगळा हल्लकल्लोळ माजेल, दृश्य जग नाहीसे होईल, जड, चंचल वितळून जाईल. फक्त एकमेव शाश्वत परब्रम्ह उरेल. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे प्रलयनाम समास चतुर्थ समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127