जय जय रघुवीर समर्थ. मनापासून भक्ती करावी. अगत्याने स्वागत करणे हा उत्तम गुण आहे. त्या महापुरुषाकडे लोक शोधत येतात असे जे महानुभव असतील त्यांनी एक समूह स्थापन करावा. भक्तीयोगाद्वारे देवाधिदेव आपला करावा. आपण अचानक मरण पावले तर मग भजन कोण करणार? म्हणून अनेक लोकांना भजनास लावावे. शिष्याला काही मागू नये, अशी आमची प्रतिज्ञा आहे. आपणानंतर शिष्याने जगदीशाचे भजन करावे. त्यासाठी असा हरिभक्तांचा समुदाय करून मोठा महोत्सव झाला पाहिजे. सहजासहजी देवाची पूजा केली पाहिजे. भजन करावे इतकेच मागणे आहे. अशा समुदायामध्ये श्रोत्यांनी सावधपणे लक्ष घालावे.
जिथे अनेकांची भक्ती घडते, तिथे प्रबोधनाची शक्ती निर्माण होते. अनेकांचे मनोगत त्याच्यासाठी आपण समजून घ्यायचं. मागे उत्तम गुण सांगितले त्याला प्रमाण मानून प्रबोधन शक्तीचे कार्य पुढे चालवावे. बोलण्यासारखे चालावे. स्वतः करावे आणि मग बोलावे. अस असेल तर लोक तुमची वचन प्रमाण मानतील. जे लोकांना मानत नाहीत त्यांना लोकही मानत नाहीत. आपण एकटे आहोत आणि लोक वेगवेगळ्या प्रकारचे आहेत; म्हणून सोबती, अनुयायी असावेत. त्यांना हळूहळू शिकवावं. हळूहळू विवेकाच्याद्वारे चांगल्या मार्गावर न्यावं. अशा प्रकारचे हे विवेकाचं काम असून नियमाने विवेकी माणूस करेल. इतर लोक असतील ते भ्रम करून भांडण करतील. आणि अनेकांशी जर एकटा माणूस भांडायला लागला तर सैन्य नसलेल्या सेनापतीसारखी त्याची परिस्थिती होईल; म्हणून अनेकांना राजी राखावं. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपणनाम समास दशम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
नामरूप दशक त्रयोदश; समास पहिला आत्मानात्मक विवेक नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. आत्मा आणि अनात्मा यांच्यामध्ये विवेक करून त्याचं विवरण करावं. त्याच निरूपण आता सावधपणे ऐका. चारी खाणी चारी वाणी ८४ लक्ष जीवयोनी संख्या ही पुराणांमध्ये सांगितलेली आहे. नाना प्रकारची शरीरे सृष्टीमध्ये दिसतात. त्यांच्यामध्ये मुख्यतः आत्मा आहे. डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, जिभेने स्वाद घेतो, नाकाने वास घेतो, सर्वांगाने तो स्पर्श करतो. वाचेद्वारे बोलतो, शब्द जाणून घेतो, सावधान आणि चंचल, चहुकडे चळवळ. हा एकटाच आत्मा इंदिराद्वारे सर्व काही चालवितो. पाय चालवतो, हात हलवतो, भुवयी ताणतो, डोळा मीचकावतो, हातवारे, संकेत खुणा दाखवतो तोच आत्मा होय. धीटपणा लाजवतो, खाजवतो, खोकतो, बघतो, ठोकतो, अन्न जेवतो, पाणी पितो तो आत्मा. मळमूत्राचा त्याग करतो, संपूर्ण शरीर सावरतो, प्रवृत्ती निवृत्ती पाहतो, भुंकतो चाखतो नाना प्रकारे ओळखतो आणि संतोषतो, घाबरतो तो आत्मा. आनंद, विनोद, उद्वेग, चिंता, काया, छाया, माया, ममता, कमीपणा, कर्तेपणा, नाना व्यथा म्हणजे आत्मा.
पदार्थाची आस्था बाळगतो, तो लोकांमध्ये बरे वाईट करतो, आपले संरक्षण करून दुसऱ्याला मारतो तो आत्मा. दोन्हीकडे युद्ध झाल्यावर शरीराला त्रास होतो, परस्परांना पाडतो पडतो तो आत्मा. तो येतो,जातो, देहामध्ये राहतो, हसतो, रडतो, पस्तावतो, व्यापाप्रमाणे समर्थ होतो, करंटा होतो. कधी भ्याड होतो, कधी बळकट होतो, विद्यावंत होतो, चतुर होतो, न्यायवंत होतो, उद्धट होतो, तो आत्मा. धीरोदात्त, उदार आणि कृपण, वेडा आणि विचक्षण, उच्छृंखल आणि सहिष्णू असतो तो आत्मा. अशी आत्म्याची वैशिष्ट्य समर्थ सांगत आहेत. पुढील वैशिष्ट्य ऐकू या पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127