जय जय रघुवीर समर्थ. आपण भरपूर जेवावे. उरलेले अन्न वाटावे; परंतु अन्न वाया घालवणे हा धर्म नाही. त्याप्रमाणे ज्ञानामुळे तृप्त व्हावे. तेच ज्ञान लोकांना सांगावे. पोहणाऱ्याने बुडणाऱ्याला बुडू देऊ नये, त्याप्रमाणे वागावे. स्वतः उत्तम गुण घ्यावे. ते अनेकांना सांगावे. वर्तन केल्याशिवाय बोलावे ते शब्द खोटे. स्नान-संध्या-देवपूजा एकाग्रपणे जप-ध्यान करणे, हरिकथा निरूपण केले पाहिजे. शरीर परोपकारी लावावे. अनेकांच्या उपयोगी पडावे. कोणालाही काही कमी पडू देऊ नये. गांजलेले, अडलेले असतील त्यांना ओळखून यथाशक्ती मदत करावी. मृदू वचनाने सर्वांशी बोलावं. दुसऱ्यांच्या दुःखामध्ये आधार द्यावा. दुसऱ्याच्या आनंदामध्ये सुख मानावे.
प्राणिमात्रांना चांगल्या शब्दांनी समजून घ्यावे. अनेकांचे अन्याय क्षमा करावे. अनेकांकडून काम करून घ्यावं. परक्या लोकांनाही आपल्या बाजूला वळवून घ्यावं. दुसऱ्याच्या मनातील गोष्टी जाणाव्या, त्यानुसार वागावे. नाना प्रकारे लोकांची परीक्षा करीत जावं. नेमके बोलावे. तात्काळ उत्तर द्यावे. कधीही राग मानू नये. क्षमा करावी. आळस करू नये. उदंड प्रयत्न करावा. एखाद्याचा शब्द धरून वितंडवाद घालू नये. उत्तम पदार्थ दुसऱ्याला द्यावा. शब्द निवडून बोलावा. सावधपणाने आपला संसार करावा. मरणाचं स्मरण असावं. हरिभक्तिस सादर व्हावं. मरण आले तरी आपली कीर्ती राखावी. नेमकेपणाने वर्तन करावं म्हणजे लोकांची मान्यता मिळते. सर्वांशी विनम्रतेने वागत असेल त्याला काहीही कमी पडत नाही. अशा प्रकारचे उत्तम गुण असलेला असेल त्याला पुरुष म्हणावे. त्याच्या भजनामुळे जगदीश तृप्त होतो. एखादा मोठ्या प्रमाणावर धिक्कार करून बोलत असला तरी देखील आपली शांतता ढळू देऊ नये. दुर्जनांना देखील आपल्या बाजूला वळवतात असे साधू असतात. उत्तम गुणांनी शृंगार केलेला आहे, असे लोक ज्ञानाच्या वैराग्यामुळे शोभतात. अशा प्रकारचे लोक हेच भूमंडळावरती चांगले असतात.
स्वतः आपण कष्टत जावं. इतरांचे त्रास सहन करीत जावे. झिजून कीर्ती मागे उरवावी. कीर्ती मिळवायची असेल तर सुख मिळणार नाही; सुख मिळवायचे असेल तर कीर्ती नाही. विचार पाहिला तर कुठेही समाधान नाही. दुसऱ्यांच्या महत्वाला धक्का लावायचा नाही. कोणाचा अनादर करायचा नाही. कधी चुका करायच्या नाही. क्षमाशील आहेत त्यांचे महत्त्व किंवा पत कधीही कमी होणार नाही. आपले असो किंवा दुसऱ्याचे सर्व कार्य करावे. एखाद्या वेळेस काम चुकवायचं हे योग्य नाही. चांगले बोलल्यावर सुख वाटतं हे तर प्रत्यक्ष समजतं; ते दुसऱ्याच्या बाबतीत देखील पाळावे. कठोर शब्दामुळे वाईट वाटते हाही अनुभव येतो मग वाईट कशासाठी बोलायचं? आपल्याला चिमटा घेतला त्यामुळे कासावीस झाला. आपल्यावरून दुसऱ्याचे मन जाणत जायचं. जो दुसऱ्याला दुःख देतो, आपली वाणी अपवित्र करतो, तो एखाद्या प्रसंगी स्वतःचाच घात करून घेतल्यासारख करीत आहे.
पेरले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते, मग कर्कश्श कशासाठी बोलायचं? आपल्या पुरुषार्थ, वैभवाद्वारे अनेकांना सुखी करावं. पण लोकांना कष्ट द्यावे ही राक्षसी क्रिया आहे. अहंकार दंभ, दर्प, अभिमान, क्रोध आणि कठीण वचन हे अज्ञानाचे लक्षण असल्याचं भगवद्गीतेमध्ये सोळाव्या अध्यायात चौथ्या श्लोकामध्ये सांगितलं आहे. जो उत्तम गुणांनी शोभला आहे तोच पुरुष चांगला. अनेक लोक त्याला शोधत फिरतात. कृतीशिवाय नुसते शाब्दिक ज्ञान म्हणजे कुत्र्याने ओकारी केल्यासारखे असून त्याच्याकडे लोक कधीही फिरकत नाहीत. उत्तम गुणांची लक्षणे समर्थ सांगत आहेत. पुढील लक्षणे पाहूया पुढच्या भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127