जय जय रघुवीर समर्थ. ब्रम्ह हे निर्मळ निश्चळ शाश्वत सर्व गोष्टींचे सार अमल आणि विमल आहे. ते गगनासारखे पोकळ आहे. त्याला काहीही करणं किंवा धरण नाही. त्याला जन्म किंवा मरण नाही. त्याला जाणणे किंवा नेणणे नाही. ते शून्याच्याही पलीकडे गेलेलं आहे. ते खचले जात नाही. ते होत नाही, ते जात नाही, ते मायेच्या पलीकडचं आहे. निरंजन आहे त्याला कोणताही पार नाही. पुढे एकोहम बहुस्याम असा संकल्प निर्माण झाला. त्याला षडगुणेश्वर असं म्हणतात. त्यालाच अर्धनारी नटेश्वर असेही म्हणतात. सर्वेश्वर, सर्वज्ञ, साक्षी, दृष्टा, ज्ञानघन, परेश, परमात्मा, जगदीश, मूळ पुरुष असेही त्याला म्हणतात. मूळ मायाही बहुगुणी, विस्तार रूपाने अधोमुख आहे तिला गुणक्शोभिनी असंही म्हणतात.
तिच्यापासून तीन गुण निर्माण झाले. विष्णू निर्माण झाला त्याला जाणती कळा सत्वगुण म्हणतात. जो त्रैलोक्याचं पालन करतो. पुढे जाणीव-नेणीव मिश्रीत ब्रह्मा निर्माण झाला. त्याच्यामुळे तीन भवन निर्माण झाली. पुढे सर्व संहाराचे कारण असलेला महेश किंवा रुद्र निर्माण झाला. तिथेच सगळं कर्तेपण आलेलं आहे. त्याच्या पुढे पंचभुते स्पष्ट दशेला आली. अष्टधा प्रकृतीचा स्वरूप त्यातून दिसून येते. निश्चल असलेल्यात हालचाल हे वायूचे लक्षण आहे. त्रिगुण आणि पंचभूते मिळून सूक्ष्म अष्टधा प्रकृती निर्माण होते. आकाश म्हणजे अंतरात्मा, त्याचा महिमा पाहून प्रत्यय घ्यावा. त्या आकाशापासून वायु जन्माला आला.
वायूच्या दोन झुळका असतात. उष्ण आणि शीतल. शितलपासून चंद्राचा जन्म झाला. उष्णापासून सूर्य, विद्युल्लता यांचा जन्म झाला. शीतल आणि उष्ण मिळून तेज आहे असं ओळखावे. तेजापासूनच पाणी निर्माण झालं. पाणी गोठलं आणि त्याच्यापासून पृथ्वीचे रूप जन्माला आले. पुढे असंख्य औषधी निर्माण झाल्या. औषधीपासून नाना रस, नाना बीज, अन्नरस तयार झाले. ८४ लक्ष जीवयोनीचा भूमंडळावरती वास झाला. अशा प्रकारची सृष्टीरचना झाली याचा विचार केला पाहिजे. अनुभव घेतल्याने ते समजून येईल. अशा प्रकारचा आकार झाला याचप्रकारे संहार देखील होतो. त्यालाच सारासार विचार असं म्हणतात. जे जे जिथून जिथून निर्माण झालं ते ते महाप्रलयात तिथेच नष्ट झालं. आद्य मध्य अवसान असले तरी जे शाश्वत निरंजन तिथेच जाणत्या पुरुषाने आपले चित्त लावावे. सृष्टीत नाना रचना होते आणि जाते पण काहीही टिकून राहत नाही त्यामुळे सारासार विचार केला पाहिजे.
अंतरात्मा हा दृष्टा, साक्षी आहे त्याचा महिमा सर्वत्र बोलला जातो. पण ही सर्वसाक्षी अवस्था आहे तिचा प्रत्यय घ्यावा. मुळापासून शेवटपर्यंत ही मायेचा सागर आहे. त्याच्यामध्ये नाना विद्या, कलाकुसर सगळे येतात. जो उपाधीचा शेवट करेल त्याला हा भ्रम आहे असे वाटेल. जो उपाधीत अडकेल, त्याला कोण बाहेर काढणार? विवेक आणि प्रत्यय यांची कामे अनुमानाच्या भ्रमामुळे कशी घडतील? सारासार विचार करून संभ्रम दूर सारून मगच ब्रह्म मिळवता येईल. ब्रम्हांडीच महाकारण म्हणजे मूळ माया आहे. अपूर्णाला पूर्णब्रह्म म्हणतात ते विवेकहीन आहेत. सृष्टीमध्ये खूप लोक आहेत. काही राजाच्या आसनाचा उपभोग घेतात तर काही विष्ठा टाकतात. स्वतःला थोर म्हणणारे उदंड लोक आहेत. पण विवेकी लोक सगळं काही जाणतात. अशा प्रकारचा हा विचार आहे.
अविवेकी लोकांच्या नादाने नाना कष्टमय साधन करून उगाच आयुष्य फुकट घालवू नये. पुस्तकामुळे ज्ञान मिळत असते तर गुरु कशासाठी करावा लागला असता? म्हणून सद्गुरूची अवस्था आवश्यकता असते. हे अनुभवावरून ठरवावे. जो बहुमताच्या आधारे वर्तन करतो तो बुडाला असं जाणावे. एक गुरु म्हणजे साहेब नसला तर कुणाला सल्ला मागायचा? असा प्रश्न समर्थ विचारत आहेत. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सृष्टी क्रम निरूपण नाम समास सहावा समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127