जय जय रघुवीर समर्थ. महाभाग्य हाताशी आले परंतु कसे भोगायचे ते माहिती नाही त्याप्रमाणे वैराग्य उत्पन्न झाले पण विवेक नाही. आदळते, आपटते, कष्टी होते, दुःखी होते, ऐकते, पाहते त्याप्रमाणे वैराग्य प्राप्त होते. प्रपंचाच्या नाना ओढीमुळे नाना संकटे, अडचणी निर्माण होतात. संसार सोडून माणूस देशोधडीला लागतो. जो चिंतेपासून सुटला, पराधीनतेपासून पळाला तो दुःखाचा त्याग करणाऱ्या रोग्याप्रमाणे असतो, परंतु असे झाले तरी मोकाट सुटू नये. उडानटप्पूपणा, भ्रष्टाचार आणि वाचाळपण अस्ताव्यस्तपण असे नसावे.
विवेक नसताना वैराग्य बाळगले तर अविवेकाने अनर्थ निर्माण होतील आणि परमार्थ आणि प्रपंच व्यर्थ जातील. प्रपंच नाही आणि परमार्थही नाही त्यामुळे सगळे जीवन व्यर्थ झाले. अविवेकामुळे असा अनर्थ झाला. हे ज्ञान व्यर्थ आहे का अशी तो बडबड करायला लागला. पण वैराग्ययोग नाही कारागृहामध्ये अडकलेल्या माणूस पुरुषार्थ सांगतो तशी परिस्थिती उद्भवेल. वैराग्य नसताना ज्ञान म्हणजे व्यर्थ अभिमान लोभ आणि दंभामुळे घुसळून माणूस कासावीस होतो. कुत्र्याला बांधलं तरी ते भूंकतं तसा स्वार्थामुळे माणूस चरफडतो. अभिमानामुळे मनुष्य दुसऱ्याच्या उत्कर्ष पाहू शकत नाही. दोन्हीपैकी एक असले तरी शोक वाटतो. आता वैराग्य आणि विवेक हे एकत्र असले की काय होते ते ऐका.
विवेकामुळे इच्छा नष्ट होतात. वैराग्यामुळे प्रपंचापासून दूर जातो. अशाप्रकारे निस्संग योगी अंतर्बाह्य मोकळा होतो. तो मुखाने जसं ज्ञान बोलतो तशीच त्याची क्रिया चालते. त्याचीही वागण्याची पद्धत पाहून शुश्चीमंत लोक देखील चकित होतात. तो त्रिलोक्याची देखील आस्था बाळगत नाही. वैराग्याची स्थिती बाणल्यावर त्याचे प्रयत्न आणि विवेक यांच्या धारणेला सीमा राहत नाही. तो रसाळ संगीतमय हरिकीर्तन, आवडीचे भजन मनापासून करतो. तात्काळ सन्मार्ग लाभावा असा मनामध्ये विवेक जागृत होतो. तेव्हा वेदांतासारखे अनुभूती आलेले शास्त्रसिद्धांत तो व्यवस्थित सांगू शकतो. सन्मार्गाने जगाला मिळाला म्हणजे जगदीश प्रसन्न होतो.
स्नान-संध्या भगवदभक्ती, पुण्य मार्ग हे प्रखर वैराग्य उदासीनता प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान होय. यालाच विवेकवैराग्य म्हणतात. नुसते वैराग्य म्हणजे एककल्लीपणाचे खुळ आहे. शाब्दिक ज्ञान हे आपल्याला कंटाळवाणे वाटते. म्हणून विवेक आणि वैराग्य दोन्ही एकत्र असणे हेच महद्भाग्य आहे. जे अधिकारी आणि साधू आहेत ते हे जाणतात असे समर्थ म्हणतात. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे विवेक वैराग्य नाम समास चतुर्थ समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127