जय जय रघुवीर समर्थ. एका पाण्याचे गुणधर्म देखील पाहिले तर अनेक दिसतात. तर पाच भूतांचा विस्तार ८४ लक्ष योनी इतका आहे. नाना देहाचे बीज उदक आहे. उदकापासून सर्व लोक, किडे, मुंगी, श्वापद निर्माण झाली. रेत, रक्त म्हणजे पाणीच होय. त्या पाण्यापासून हे शरीर नखे, दात, अस्थि निर्माण होतात. सूक्ष्म तंतुमय मुळे- शाखा उदकापासून निर्माण होतात त्या उदकामुळेच वृक्षांचा विस्तार होतो.
आंब्याचे वृक्षाला मोहर येतो, पाने फुले लगडतात सगळं पाण्यापासून तयार होते. खोड फोडून पाहिले तर आंबे दिसत नाहीत. फांद्या फोडून फळ पाहिली तर ओली साले! मुळावरून शेवटपर्यंत फळ दिसत नाही. नंतर जळरूपी फळ निर्माण होते, हे चतुर माणूस जाणतो. तेच पाणी शेंड्यापर्यंत जाते तेव्हा वृक्षाला फळ येते. अशा प्रकार पत्र पुष्प फळ किती भेद सांगावे? सूक्ष्मदृष्टीने पाहिले तर दिसते. भूतांचे कितीतरी विकार आहेत ते क्षणोक्षणी पालटतात एकापासून अनेक नाना वर्ण होतात. त्रिगुणभूतांची लटपट पाहिली तर खूप सांगता येईल. त्यात सारखा बदल होत राहतो, तो किती म्हणून सांगावा? या प्रकृतीचे म्हणजेच अष्टधामायेचे निराकरण करून तिला ओलांडून परमात्म स्वरूपाशी तद्रूप होऊन सुखेनैव असावे. अशा तऱ्हेने अनन्यभावाने परमात्म्याला भजावे असं समर्थ सांगत आहेत. जय जय रघुवीर समर्थ, इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे गुणरूप निरूपण नाम समास षष्ठ समाप्त.
दशक नऊ समास ७ विकल्प निरसन नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. आधी स्थूल आहे. नंतर अंत:करण पंचक निर्माण झाले. स्थूल जाणताना विवेक बाळगला पाहिजे. ब्राह्मांदाविना मूळमायेला जाणीव नाही. स्थूळाच्या आधारावरच कार्य चालते. हे स्थूलच निर्माण केले नसते तर अंतकरण कुठे राहिले असते? असा श्रोत्यांनी प्रश्न केला. त्याचं उत्तर ऐका. रेशमाचे किडे किंवा शरीराच्या रक्षणासाठी कठीण कवच तयार करणारे किडे, पृष्ठभागावर आपल्या कुवतीनुसार जीव लहान मोठी घरे निर्माण करतात. शंख शिंपले घुला कवडे त्याच्यामध्ये ते किडे, प्राणी राहतात. आधी प्राणी असतात मग ते घर निर्माण करतात हे तुम्हाला प्रत्यक्ष दिसते सांगायची गरज नाही. त्याप्रमाणे आधी सूक्ष्म आणि मग स्थूल निर्माण होते या दृष्टांतामुळे श्रोत्यांच्या प्रश्नाला उत्तर मिळाले.
तेव्हा श्रोता पुन्हा विचारतो की, मला जन्ममृत्यूचा विवेक सांगावा. कोण जन्मास घालते आणि पुन्हा कोण जन्म घेते, हे प्रत्ययाला कसे येते, कशाप्रकारे येते? ब्रम्हा जन्मास घालतो, विष्णू प्रतिपाळ करतो, रुद्र संहार करतो असं सांगतात तरी हे जनरूढीचे बोलणे आहे. त्याचा प्रत्यय काही येत नाही. प्रत्यय नसेल तर योग्य होणार नाही. ब्रह्माला कोणी जन्माला घातलं विष्णूला कोणी प्रतिपाळलं रुद्राला महाप्रलयात कोणी संहारलं? हा सृष्टी भाव म्हणजे नाटक हा मायेचा स्वभाव आहे. कर्ता निर्गुण देव म्हटले तर तो निर्वीकरी आहे. मग माया कशी जन्माला घातली? किंवा ही आपणच विस्तारली आणि विस्तारता ती स्थिर झाली असंही नाही. आता जन्मतो कोण? त्याची कशी ओळख पटवायची आणि संचिताचे लक्षण काय? तेही सांगावे. पुण्याचे रूप कसे असते आणि पापाचे स्वरूप कसे? हाही प्रश्न आहे. कर्ता कोण? हे काहीच अनुमानास येत नाही. वासना जन्म घेते असे म्हणतात पण ती पहिली तरी दिसत नाही आणि धरता येत नाही. वासना, कामना आणि कल्पना, हेतू, भावना, मती अशा अंतकरण पंचकाच्या अनंत वृत्ती आहेत. याबाबत माहिती समर्थ देत आहेत. पुढील माहिती ऐकूया पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127