आपण सावधान असलो आणि आपले मन एकाग्र असले तर भोजन केल्यावर जेवण गोड वाटते. भोजनानंतर काही वाचन, चर्चा करावी. एकांतात जाऊन नाना ग्रंथांचे वाचन, मनन करावे तरच तर प्राणी शहाणा होतो, नाहीतर मूर्ख राहतो. लोक खातात आणि आपण दीनवाणेपणाने पाहतो. एकही क्षण रिकामा जाऊ न देणे हे भाग्यवंताचे लक्षण आहे. प्रपंच व्यवसायाचे ज्ञान बऱ्यापैकी असावे. काहीतरी मिळवावं, मगच जेवण करावं. संकटात सापडलेल्या लोकांना मदत करावी काहीतरी चांगले काम करून शरीर कारणी लावावे. काही धर्मचर्चा, पुराण, हरीकथा निरूपण करीत राहावे. संसार आणि परमार्थ दोहोतही एकही क्षण वाया जाऊ देऊ नये. दोन्ही बाबतीमध्ये दक्ष असावे. असा जो नेहमी सावध असतो त्याला खेद कसा असेल? विवेक नसेल तर देह बुद्धीचा संबंध तुटेल. आहे ते सगळे देवाचे आहे असा निश्चय करून वर्तन केले तर दुःखाचे मूळच नाहीसे होईल. प्रपंचामध्ये सुवर्ण पाहिजे, परमार्थामध्ये भक्ती पाहिजे. महावाक्याचे विवरण केल्यावर प्रपंचाची आवड सुटते. कर्म उपासना आणि ज्ञान यामुळे समाधान राहते. परमार्थाचे साधन असते ते नेहमी ऐकत जावे असा उपदेश समर्थांनी केलेला आहे. इतिश्री गुरुशिष्य संवादे शिकवण निरूपण नाम समास तृतीय समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक 11 समास 4 चार विवेक निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. ब्रम्ह म्हणजे निराकार. हा विचार गगनासारखा आहे. विकार नसलेले निर्विकार असते तेच ब्रह्म होय. ब्रम्ह म्हणजे निश्चळ अंतरात्मा मात्र चंचळ. त्याला दृष्टा केवळ साक्षी किंवा द्रष्टा म्हणतात. तो अंतरात्मा म्हणजे देव. त्याचा स्वभाव चंचल असतो, आतमध्ये बसून तो सगळ्या जीवांचे पालन करतो. जड पदार्थ त्या पेक्षा वेगळे असतात. त्याच्याशिवाय देह व्यर्थ. त्याच्यामुळेच परमार्थ आणि सगळे काही समजत. कर्ममार्ग, उपासनामार्ग, ज्ञानमार्ग, सिद्धांतमार्ग, प्रवृत्तीमार्ग, निवृत्तीमार्ग, देवचं चालवितो. चंचलाशिवाय निश्चल कळत नाही. चंचल असले ते स्थिरावत नाही. असे अनेक विचार असतात. चंचल आणि निश्चल यांच्यामध्येच शुन्यत्वाचे विध्न येते. त्या मुळे बुद्धी भांबावण्याची शक्यता असते. कर्ममार्गाची प्रक्रिया मग अलिकडेच राहून जाते. सगळ्यांचे मूळ देव आहे. देवाला मूळ किंवा डहाळी नाही. परब्रह्म मात्र निश्चळ, निर्विकारी आहे. निर्विकारी आणि विकारी एक आहे असे म्हणेल तो भिकारी. असा विचार विवेकाने नष्ट होतो. सगळ्या परमार्थामध्ये पंचीकरण म्हणजे भौतिक शरीर पंचमहाभूतात विलीन करणे आणि प्रज्ञानं ब्रह्म, अहं ब्रह्मास्मि, तत्वमसी,व अयम आत्मा ब्रह्म ही महावाक्य मूळ आहेत. तेच पुन्हा पुन्हा आठवावे. स्थूल शरीर हा पहिला देह, मूळमाया हा आठवा देह, या आठ देहांचे निरसन केल्यावर विकार कसा राहील? विकारी माणूस मात्र ही मायाच खऱ्यासारखी मानून एक समजतो. पण उत्पत्ती, स्थिती, संहार यापेक्षा निर्विकार वेगळा आहे, हे समजण्यासाठी सारासार विचार केला पाहिजे. दोन्ही एक मानले तर तिथे विवेक उरला असं कसं म्हणता येईल? ही परीक्षा ज्यांना करता येत नाही ते दरिद्री, पापी, करंटे! जो एकच सर्वत्र विस्तारला आहे त्याला अंतरात्मा असे म्हणतात. नानाविकारांमध्ये विकारलेला असतो तो निर्वीकारी नव्हे. असं हे स्पष्टच आहे. त्याचा प्रत्यय घेऊन पहिला तर काय राहते, काय राहत नाही हे समजेल. जे अखंड होत जाते, जे नेहमी संहारले जाते, लोकांमध्ये प्रत्यक्ष प्रचितीला येते. एक रडतो, एक चरफडतो, एक दुसऱ्याची नरडी धरतो, एकमेकांना दुष्काळातील बुभुक्षितांसारखे झोंबतात. निती नाही, न्याय नाही अशाप्रकारे लोक वर्तन करतात आणि त्याला चांगले असे विवेकहीन लोक म्हणतात. माती टाकून अन्न खावे आणि बाष्कळपणाने सगळे सार म्हणावे तसे हे आहे. म्हणून हा विचार करावा सत्यमार्गच धरावा. विवेकाचा लाभ जाणून घ्यावा, असे समर्थ सांगत आहेत.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127