जय जय रघुवीर समर्थ. एक सगळ्यांचा अंतरात्मा, विश्वामध्ये राहतो तो विश्वात्मा, तर काही द्रष्टा साक्षी ज्ञानात्मा मानतात. एक निर्मळ, निश्चळ, चंचल नसलेला अनन्यभावाने वस्तूला ते मानतात. एक नाना प्रतिमामय आहे तर दुसरा अवतार महिमा आहे. तिसरा अंतरात्मा आहे. चौथा निर्विकार आहे. असे चत्त्वार देव आहेत. यापेक्षा वेगळा सृष्टीचा स्वभाव नाही. सगळे एकच मानतात, ते देव जाणतो पण अष्टधा प्रकृती ओळखली पाहिजे. प्रकृतीमधील देव तो प्रकृतीचा स्वभाव. भावातीत असलेला महानुभाव विवेकाने जाणावा. जो निर्मळाचे ध्यान करील तो निर्मळ होईल, जो ज्याचे भजन करेल तो त्याचे रूप जाणावा. निरक्षीर निवडतात त्यांना राजहंस म्हणतात आणि सारासार जाणतात त्यांना महानुभाव म्हणतात. जो चंचलाचे भजन करील तो सहजपणे चळेल आणि जो निश्चलाचे भजन करेल तो निश्चल होईल. प्रकृतीनुसार चालावे पण आतील शाश्वत ओळखावे. सत्य होऊन देखील लोकांसारखे वावरावे. असं समर्थ सांगतात. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे चत्वार देव निरूपण नाम समास द्वितीय समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक ११ समास २ शिकवण निरुपण नाम समास
अनेक जन्मांच्या शेवटी अकस्मात नरदेहाची प्राप्ती होते. तिथे नितीन्यायाद्वारे व्यवस्थित वर्तन केले पाहिजे. नीतीनेमाने प्रपंच करावा. परमार्थाचा विवेक पहावा. त्यामुळे इहलोक आणि परलोक दोन्हीही संतुष्ट होतात. माणसाचे वय शंभर वर्षे मानले तर त्यात बालपण अजाणतेपणामध्ये गेले, तारुण्य विषयभोगात खर्च केले. वृद्धपणी नाना रोग जडतात,कर्मभोग असे त्याला म्हणतात. मग भगवंताचा योग कोणत्या वेळी येणार? राजकीय, दैविक, उद्वेग, चिंता, अन्न, वस्त्र, देहममता नाना प्रसंग जीवनामध्ये येतात आणि त्याच्यातच जन्म जातो. लोक मरतात. वडील माणसे गेली ही प्रचिती असते. जाणून जाणून तरी काय जाणले? घराला आग लागली आणि झोपून राहिला त्याला चांगला कसं काय म्हणायचं? आत्मघातकी असं त्याला म्हणावं लागेल. पुण्यमार्ग सगळा बुडून गेला आणि पापाचा संग्रह उदंड झाला. यमयातनेचा झोका फार कठीण आहे. तरी आता असं करू नका. विचारपूर्वक वर्तन करा. इहलोक आणि पररोक साधा. दोन्हीचाही लाभ घ्या.
आळसाचे रोकडे फळ म्हणजे जांभया आणि झोप, हे सुख आळशी लोकांना आवडते. कष्ट केले तर श्रम होतात पण पुढे त्यांना सुख मिळते. प्रयत्न करून खातात, जेवतात, सुखी होतात. आळस हा उदास, नागवणूक करणारा आहे. आळसामुळे प्रयत्न बुडतात. आळसामुळे करंटेपणाच्या खुणा प्रगट होतात, म्हणून आळस नसावा तरच वैभव मिळू शकते. या लोकी आणि परलोकी जीवाला समाधान मिळू शकते. प्रयत्न कसा करावा याच हे निरूपण आहे. त्यासाठी क्षणभर अंत:करण सावध करा. सकाळी लवकर उठावे, काही पाठांतर करावे, यथाशक्ती आठवावे. सर्वोत्तमाची आठवण करावी. मग अशा दिशेकडे जावे जे कोणालाच ठाऊक नाही.
निर्मळ पाणी घेऊन शौच, आचमन करावे, मुखमार्जन, प्रातःस्नान, संध्या, तर्पण देवतार्चन पुढे यथासांग वैश्वदेव उपासना करावी. काही फलाहार घ्यावा, मग संसार धंदा करावा. चांगले शब्द बोलून सगळ्या लोकांना राजी ठेवावे. जो ज्याचा व्यापार आहे तिथे काळजीपूर्वक राहावे, खबरदार रहावे. लक्ष दिले नाही तर मग फसवाफसवी होते. चुकते, फसवले जाते, विसरते, सांडते, आठवण झाल्यानंतर मनुष्य चरफडतो. अशाप्रकारे आळसाची रोकडी प्रचिती येते. असं नेहमीच वर्तन कस असाव याची माहिती समर्थ देत आहेत. पुढील माहिती ऐकू या पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127