जय जय रघुवीर समर्थ. देहच सोडून गेला, तिथे अंतरात्मा कसा उरला? हे नाव तरी कसे उरणार? निर्विकारामध्ये विकाराला जागा नाही. निश्चळ परब्रम्ह एकच आहे ते माईक आहे असा हा प्रत्यय निश्चित असून तो विचारपूर्वक पहावा. इथे खळखळ करायची गरज नाही. एक चंचल, एक निश्चल. शाश्वत कोणते ते केवल ज्ञानाद्वारे ओळखावे असार वस्तूंचा त्याग करून सार घ्यावे म्हणून सारासार विचार नित्य-अनित्य निरंतर असा ज्ञानी करतो.
शाब्दिक ज्ञानाचे अनुभवात रुपांतर होते, जिथे मनच ऊन्मन होते, तिथे आत्म्याला चंचलपण कसे राहील? हे सांगोवांगीचे काम नाही. आपल्या अनुभवाद्वारे ते जाणावे. प्रत्यय नसताना परिश्रम घेणे हे पाप आहे. सत्याएवढे सुकृत नसते. असत्या एवढं पाप नाही. प्रचितीशिवाय कुठेही समाधान नाही. सत्य म्हणजे स्वरूप जाण, माया असत्य हे प्रमाण. इथे रूपांसह भावपूर्ण सांगितले. दृश्य पाप निघून गेले, पुण्य परब्रम्ह उरले, अनन्य होताच नामाच्या पलीकडे गेले. आपण स्वतः सिद्ध वस्तु आहोत. तिथे देहाचा संबंध नाही. अशा प्रकारे पापाच्या राशी जळून जातात. अन्यथा ब्रह्मज्ञानाच्या व्यतिरिक्त जे जे साधन असेल तो तो शीण आहे. त्याच्यामुळे नाना दोषांचे क्षालन कसे होईल?
पापाची आवड निर्माण झाली की नंतर पापच घडते आत मध्ये रोग झाला आणि वरवरचे उपचार केले तर त्याचा काय उपयोग बर? नाना क्षेत्राना भेटी देऊन मुंडन केले, नाना तीर्थांना जाऊन स्वतःला शिक्षा करून घेतली, नाना निग्रह केले, नाना मृत्तिकेने घासले किंवा तप्त मुद्रेने डाग दिले, असे वरवरचे उपाय केले तरी शुद्ध होता येत नाही. शेणाचे गोळे गिळले, गोमुत्राचे गाडगे घेतले, रुद्राक्षाच्या माळा, काष्ठाचे मणी घातले. वरवरचा वेष केला पण आत मध्ये दोष भरलेला आहे. त्या दोषाचे दहन करण्यासाठी आत्मज्ञान पाहिजे. नानाव्रते, नाना दाने, नाना योग, तीर्थाटने या सगळ्यांपेक्षा आत्मज्ञानाचा महिमा कोटी कोटी पटीने अधिक आहे. जो सदा आत्मज्ञान पाहतो त्याच्या पुण्याला कोणतीही मर्यादा नाही. दुष्ट पातकांची बाधा निघून गेली.
वेदशास्त्रात सांगितलेले सत्य स्वरूप, तेच ज्ञानाचे रूप. त्याचे पुण्य अमाप झाले आणि सुकृत्यांनी सीमा ओलांडली. या अनुभवाच्या गोष्टी आहेत. आत्मदृष्टीची प्रचिती पहावी. प्रचितीवेगळे राहून कष्टी होऊ नये. लोकांना अनुभव नसला तर सगळा शोक होतो. रघुनाथ कृपेने सगळ्यांना अनुभवाचा प्रत्यय यावा असा आशीर्वाद समर्थ देत आहेत. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे चलाचल निरूपण नाम समास दशम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक अकरावा समास पहिला भीम दशकनाम दशक
श्रीराम. आकाशापासून वायू होतो असा अनुभव आहेच. वायूपासून अग्नी निर्माण होतो. त्याची माहिती सावधपणे ऐका. वायूच्या कठीण स्वरूपामधून वन्ही निर्माण होतो तर मंद झुळकेपासून शितल पाणी तयार होते. पाण्यापासून पृथ्वी झाली. ती नाना बीजरूप जाणावी. बिजापासून उत्पत्ती होते हा तर स्वभावच आहे. मुळातच सृष्टी ही कल्पनाच आहे. कल्पना म्हणजे मूळमाया. तिच्यापासून देवत्रयाची काया झाली. निश्चयामध्ये चंचल म्हणजे केवळ कल्पना. अष्टधा प्रकृतीचे मूळ अशा तऱ्हेने कल्पनारूप आहे. कल्पना म्हणजेच अष्टधा प्रकृती. अष्टधा म्हणजेच कल्पना मूर्ती. मुळाग्रापासून झालेली उत्पत्ती म्हणजे अष्टधा जाणावी. पाच भूते व तीन गुण दोन्ही मिळून आठ म्हणून ही अष्टधा प्रकृती असे म्हणतात. ती कल्पनेचे रूप घेऊन आली, पुढे फोफावली आणि मग सृष्टीचे रूप घेऊन जडत्वास आली. मूळ झाली म्हणून ती मूळ माया, त्रिगुणी झाली म्हणून ती गुण माया आणि सृष्टीचे रूप घेऊन जडत्व पावली म्हणून अविद्या माया. पुढे चार भाग झाले, चार वाणी विस्तारल्या आणि नाना योनी नाना व्यक्तींमध्ये प्रगटल्या. अशी सृष्टीरचनेची माहिती समर्थ देत आहेत. पुढील माहिती ऐकूया पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127