जय जय रघुवीर समर्थ. परमात्मा परमेश्वर परेश ज्ञानघन ईश्वर जगदीश जगदात्मा जगदेश्वर अशी ईश्वराला अनेक नावे आहेत. सत्तारूप ज्ञानस्वरूप प्रकाशरूप ज्योतिरूप कारणरूप चिद्रूप अलिप्त आत्मा अंतरात्मा विश्वात्मा द्रष्टा साक्षी सर्वात्मा क्षेत्रज्ञ श्रीनाथ जीवात्मा देही कुटस्थ असेही त्याला म्हणतात. इंद्रात्मा ब्रम्हात्मा हरिहरात्मा यमात्मा धर्मात्मा नैऋत्यात्मा वरूण वायू कुबेरात्मा ऋषी देव मुनी धर्ता गणगंधर्व विद्याधर यक्ष किन्नर तुंबर नारद या सगळ्यांचे मूळ म्हणजे सर्वात्मा.
चंद्र सूर्य तारामंडळे भूमंडळे मेघमंडळे एकवीस स्वर्ग सप्त पाताळ अंतरात्मा चालवीत असतो. अशा तऱ्हेने या गुप्तवल्लीची पुरुष नावे घेतली आता स्त्रीनामे श्रोत्यांनी ऐकली पाहिजेत. मूळमाया जगदीश्वरी परमवीर परमेश्वरी विश्ववंद्या विश्वेश्वरी त्रैलोक्यजनंनी अंतरहेतू अंतरकळा मौन्यगर्भ जाणीवकळा धारणा चपळ जगतज्योती जीवनकला परा पसंती मध्यमा युक्ती बुद्धि मती धारणा सावधानता नाना चालना भूत भविष्य तिच्याद्वारे उकलून दाखविले जाते. जागृती स्वप्न सुशुप्ती जाणीव तुर्या तटस्थता सुखदुःख मानापमान असे सर्व ती जाणते. ती परम कठीण कृपाळू ते परमकोमळ स्नेहाळू परम क्रोधी लोभाळू मर्यादेवेगळी शांती क्षमा विरक्ती भक्ती अध्यात्मविद्या सायुज्यमुक्ती विचारणा सहजस्थिती जिच्यामुळे असते.
आधी पुरुषानामे आणि त्यानंतर स्त्री नामे सांगितली आता चंचलाची नपुसकनावे ऐकली पाहिजेत. जाणणे अंत:करण चित्त श्रवण मनन चैतन्य जीवित येते जाते अशी अनेक नावे आहेत ती लक्ष देवून ऐका. मी पण तू पण जाणतेपण सर्वज्ञपण जीवपण शिवपण ईश्वरपण अलिप्तपण असंही त्याला म्हणतात. अशी नावे उदंड आहेत पण ती जगतज्योती एकच आहे. सर्वांतरात्मा विचारवंत असतात ते ती जाणतात. आत्मा जगतज्योती सर्वज्ञपणा हे तिन्ही म्हणजे एकच आहे. त्याला एक अंतकरण प्रमाण आहे. अनुभव प्रमाण आहे. अशाप्रकारे स्त्री-पुरुष नपुसक नामाचे, पदार्थांचे ढीग झाले परंतु सृष्टी रचनेची कितीतरी नाव सांगता येतील. सगळं पाहिलं तरी अंतरात्मा एकच आहे. मुंगीपासून ब्रह्मादिक त्यानुसारच चालतात. तो अंतरात्मा कसा आहे, तो कसा ओळखायचा?
विविध प्रकारचा तमाशा इथेच आहे. तो कळतो पण दिसत नाही. प्रचिती येते पण भासत नाही. शरीर आहे पण एका ठिकाणी वस्ती करत नाही. सूक्ष्मपणाने आकाशामध्ये असतो, सरोवर दिसताच पसरतो, सगळे पदार्थ व्यापून उरतो. चहूकडे सर्व पदार्थ व्यापून उरतो, पदार्थ दृष्टीला दिसतो त्याच्यासारखाच तो होतो. वायूपेक्षाही तो चंचल असतो. अनेक डोळ्यांनी तो पाहतो, कित्येक रसनेने म्हणजे जिभेने तो चव चाखतो, कित्येक मनांनी तो ओळखतो. श्रोत्यांमध्ये बसून शब्द ऐकतो, नाकाने वास घेतो, त्वचेद्वारे शीत-उष्ण जाणतो. अशा तऱ्हेच्या त्याच्या अंतर्कळा आहेत पण तो सगळ्यांपेक्षा निराळा आहे. त्याची अगाध लीला तोच जाणे! तो पुरुषही नाही, सुंदरीही नाही, तो बाळ नाही तरुण नाही किंवा कुमार नाही. तो नपुसकाच्या देहात असतो परंतु नपुसक नसतो. तो सगळा देह चालवतो म्हणून त्याला करून अकर्ता असे म्हणतात. तो क्षेत्रज्ञ क्षेत्रवासी असतो म्हणून त्याला देही कूटस्थ असे म्हणतात.
‘द्वाविमौ पुरुषोलोके क्षरश्चाक्षर एव च.. क्षर सर्वांणी भूतानी कुटस्थोक्षर उच्चते..’ जगामध्ये दोन पुरुष असतात. त्याला क्षर आणि अक्षर असे म्हणतात. सर्व भूतेही नाशवंत म्हटली जातात पण अक्षर जे असते त्याला कूटस्थ म्हणतात. उत्तम पुरुष किंवा उपाधीशून्य परब्रम्ह तो निःप्रपंच निष्कलंक निरंजन परमात्मा निरंकारी निर्विकारी असतो. अशा तऱ्हेने चारी देह सांगावे. साधकाने देहाच्या पलीकडे जावे. देहाच्या पलीकडे गेल्यावरच तो अनन्यभक्त झाला असे जाणावे. अशाप्रकारे चलाचल जगताचे वर्णन समर्थ करीत आहेत पुढील वर्णन ऐकू या पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127