जय जय रघुवीर समर्थ. वायु वितळताच सूक्ष्मभूते आणि त्रिगुण निर्माण होतात. त्यावेळी मूळ माया निर्विकल्प स्वरूपी लीन होते. त्या ठिकाणी जाणीव राहून शुद्ध स्वरूपस्थिती अनुभवास येते. जितकी नावे दिली जातात तितके प्रकृतीची रूपे आहेत. मात्र प्रकृती नसताना हे बोलले जाते हे विशेष. सृष्टी असतानाच, प्रलयाची वाट न पाहता विवेक केला पाहिजे. त्याला विवेक प्रलय असे म्हणतात. अशाप्रकारे पाच प्रलयांची माहिती उत्तम प्रकारे तुला दिली. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे पंचप्रलय निरूपण नाम समास पंचम समाप्त.
दशक दहा समाज सहा भ्रमनिरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. उत्पत्ती, स्थिती, संहार यांच्या व्यवहाराची माहिती तुला दिली. परमात्मा मात्र जसाच्या तसा निर्गुण निराकार असतो. होणे वर्तणे आणि जाणे याचा तिथे कोणताही संबंध नाही. आद्य मध्य व शेवट हे चालूच असते. परब्रम्ह कायम असतेच. मध्येच हा भ्रम भासतो. हा भास झाला तरी काळ गेल्यावर तो भ्रम नष्ट होतो. उत्पत्ती स्थिती संहार यामध्ये परब्रह्म अखंड आहे. पुढे शेवटी सर्वांना कल्पांत आहे. याच्यामध्ये ज्याला विचार आहे तो सारासार विचार असल्याने हे आधीच जाणतो.
खूप भ्रमिष्ट असतात तेथे मात्र जाणकाराचे काही चालत नाही. सृष्टीमध्ये उमजले आहे असे थोडेच आहेत. त्या उमजल्याचे लक्षण थोडक्यात सांगतो. भ्रमाहुन हे महापुरुष विलक्षण असतात. ज्याला भ्रम नसतो त्याच्या मनावरून त्याला ओळखावे. आता भ्रम कसा असतो ते सांगतो. एक परब्रम्ह जसेच्या तसे आहे त्याला कोणतेही विकार नाहीत, त्याच्या विरुद्ध भ्रमाचे रूप आहे. ज्याला कल्पांत असे म्हणतो तो, त्रिगुण आणि पंचभुत हे सगळे भ्रमरुप आहे. मी-तू हा भ्रम आहे. उपासनाही भ्रम आहे. ईश्वरभाव हाही निश्चितपणे भ्रम आहे. भ्रमेनाहं भ्रमेण त्वं भ्रमेणोपासका जनः ..भ्रमेणेश्वर भावत्वं भ्रममूलमिदम जगत.. याप्रमाणे सृष्टी भासते परंतु हा सर्व भ्रम आहे. यामध्ये जे विचारवंत आहेत तेच धन्य आहेत. आता भ्रमाचा विचार दृष्टांत सांगून स्पष्ट करतो. दूरच्या देशामध्ये भ्रमण करताना आपली दिशाभूल होते. जिवलगांची ओळख पटत नाही, याला भ्रम म्हणतात.
उन्मत्तासारखे द्रव्य उपभोगले, त्यामुळे अनेक भास झाले, नाना व्यथा जाणवल्या, भुताने झपाटले तो एक भ्रम. दशावतारी पुरुष असून नारी वाटतात, जादूचे प्रयोग मनामध्ये संदेह निर्माण करतात त्याला भ्रम म्हणतात. एखाद्या ठिकाणी वस्तू ठेवलेली असेल ती जागाविसरते, एखाद्या रस्त्यावरून जाताना मार्ग चुकतो, शहरामध्ये भांबावतो याला भ्रम म्हणतात. वस्तू आपल्यापाशी असली तरी ती हरवली म्हणून कासावीस होतो. आपले आपणच विसरतो त्याला भ्रम म्हणतात. काही गोष्टी विसरून जातो, शिकलेले विसरतो, स्वप्नातील दुःखामुळे घाबरा होतो, त्याला भ्रम म्हणतात. वाईट चिन्हे आणि अपशकुन, खोट्या वार्तेने मन दुखावते, त्याला भ्रम म्हणतात. झाड लाकूड पाहिले मनात वाटते भूत आले. काहीही नसताना हडबडला याला भ्रम म्हणतात. पाण्यामध्ये काच पडलेली आहे ती दिसत नाही, आरशातली सभा पाहून दोन सभा वाटतात, दार लक्षात न आल्याने दुसरीकडे जातो याचे नाव भ्रम.
एक असताना दुसरेच वाटते, एक सांगितले तर दुसराच समजतो, एक दिसले तर दुसरेच उठते याचे नाव भ्रम. आता जे जे दिले जाते ते ते परत येते, मेलेले माणूस भोजनाला येते हा भ्रम आहे. या जन्मानंतर पुढल्या जन्मी मी काहीतरी मिळवेन, मनुष्याच्या नावामध्ये प्रीती गुंतली याचे नाव भ्रम. मेलेला मनुष्य स्वप्नामध्ये आला, त्याने काही मागितलं, मनामध्ये तीच गोष्ट धरून बसला याचे नाव भ्रम. असं भ्रमाचं वर्णन समर्थ करीत आहेत. पुढील वर्णन ऐकू या पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1