जय जय रघुवीर समर्थ. जाणीव म्हणजे अंत:करण. अंतकरण हा विष्णूचा अंश आहे असे जाण. अशाप्रकारे विष्णू पालन करतो. अज्ञानी प्राणी मारला जातो. अज्ञानी असेल तर तो संहारला जातो. नेणत्याला तमोगुण असं म्हणतात. तमोगुणामुळे रुद्र संहार करतो. काही जाणीव आणि काही नेणीव हा रजोगुणाचा स्वभाव आहे. जाणता आणि नेणता जीव जन्मास येतो. जाणीवेने सुख होते नेणीवेने दुःख होते. उत्पत्तीमुळे सुखदुःख निर्माण होते. जाणण्या-नेनण्याची बुद्धी हा देहाचा धर्म. स्थूल देहामध्ये त्रिशुद्धी असते त्याचा उत्पत्तीकर्ता ब्रह्मा असतो. उत्पत्ती, स्थिती आणि संहार अशा प्रकारचा जो विचार इथे व्यक्त झालेला आहे त्याचा प्रत्यय प्रत्येकाने घ्यावा. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे अंतकरण एक नाम समास प्रथम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक दहावे समास दुसरा देह आशंका नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. स्वामींनी विचार दाखविला पण इथे विष्णूचा अभाव आहे. ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे उत्पत्ती स्थिती संहार असे म्हटले जाते पण त्याचा काही अनुभव येत नाही. ब्रह्मा हा चार मुख असलेला उत्पत्तीकर्ता. त्याचा काही प्रत्यय नाही. पालनकर्ता विष्णू चार भुजा असलेला आहे त्याची देखील ऐकून माहिती आहे. महेश हा संहार करतो याचाही प्रत्यय कसा येईल? लिंगपुराणात त्याचा महिमा सांगितला आहे तो विपरीत आहे, शिव हाच उत्पत्ती स्थिती आणि लय करणारा सांगितला आहे. मूळमायेला कोणी केले हेही समजले पाहिजे. तिच्यामुळे देवाचे रूप झाले. मूळमाया ही लोकजननी आहे तिच्यापासून गुणक्षोभिणी निर्माण झाली गुणक्षोभिणीपासून त्रिगुणी म्हणजे ब्रम्हा विष्णू महेश या तीन देवांचा जन्म झाला असं शास्त्र करणारे लोक बोलतात आणि सर्वसामान्य लोकही बोलतात. पण त्याचा अनुभव विचारला असता त्यांना सांगता येत नाही त्यांना विचारावे तर तो काही अनुभव मिळत नाही आणि प्रत्यय नसेल तर नाना प्रयत्न उपयुक्त ठरत नाहीत.
प्रचिती नसूनही वैद्य म्हणवतो, उगाच उठाठेवी करतो तर त्याला लोक मानतील का? त्या मूर्खाला प्राणीमात्र किमत देणार नाही. तसाच हाही विचार आहे. प्रत्ययाने खात्री पटवावी. प्रत्यय नसेल तर गुरु आणि शिष्य या दोघांनाही अंधकारच म्हणायचं. बर लोकांना काय म्हणायचं? लोक म्हणतात तेच बरोबर पण हे स्वामींनी विशद करून सांगावं. असे म्हणतात की, देवीने माया केली त्यामुळे देवांची रूपे मायेमध्ये आली, मायेने माया केली असं म्हटलं तरी दुसरी माया नाही. भुतांनी माया निर्माण केली तरी तिने भुतांचीच वाट लावली. परब्रह्माने माया केली म्हणावे तर ब्रह्मामध्ये कर्तुत्व नाही आणि माया खरी मानली तरी ती ब्रह्मामध्ये कर्तृत्व निर्माण करते. माया खोटी असं जाणल तर तिचे कर्तृत्व काय? असे प्रश्न निर्माण होतात आणि मनाला त्याचा अनुभव यावा असे देवाने काहीतरी केले पाहिजे. मातृकाविना वेद नाही आणि ह्या ज्या मातृका आहेत त्या देहाशिवाय नाहीत. एका देहाशिवाय दुसरा देह निर्माण होत नाही. त्या देहामध्ये नरदेह असतो, त्या नरदेहामध्ये ब्राह्मण देह असतो, त्या ब्राह्मण देहाला वेदाचा अधिकार आहे. असो. वेद कुठून आले आणि देह कशासाठी झाला? मग देव कसे प्रकटले कशाप्रकारे प्रकटले अशाप्रकारे प्रश्न निर्माण झाले. याचे समाधान करायला हवं.
त्यावर वक्ता म्हणाला, आता सावधान हो. प्रत्यय पाहिल्यावरती साकडे पडते, सगळे काही बिघडते आणि तर्क केला अनुमान केलं तर उगीचच काळ वाया जातो. जनरूढी आणि शास्त्राचा निर्णय वेगळा असतो त्यामुळे एक प्रत्यय येत नाही. आता शास्त्रांची भीड धरली तर गोंधळ सुटत नाही आणि गोंधळ आहे म्हणून शास्त्रामध्ये भेद वाटतो. शास्त्राचे रक्षण करून प्रत्यय दिला. पूर्वपक्ष त्यागून सिद्धांत पाहिला. एका वचनाने शहाण्या मुर्खाला समजाविले. शास्त्रामध्येच पूर्वपक्ष बोललेला आहे. खोट्याला पूर्वपक्ष म्हणावे. विचार केला तर आम्हाला ते शब्दात मांडता येत नाही. परंतु शास्त्राचे रक्षण करून काही बोलून कौतुक करून श्रोत्यांना विचारपूर्वक काही सांगितले पाहिजे. असे समर्थ म्हणतात. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे देह आशंका नाम समास द्वितीय समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1