जय जय रघुवीर समर्थ, परमार्थी आणि विवेकी यांचे करणे लोक मानतात; कारण ते विवरण करताना चुका होऊ देत नाहीत. लोकांना जो जो संदेह वाटतो, तो त्यांच्याकडे नसतो. त्यामुळे आदि-अंत अनुमानावर आणून सोडतात. ते स्वतः निस्पृह नसतील त्याचं बोलणं लोक मानत नाहीत. जनता जनार्दनाला राजी राखणे कठीण आहे. कोणी बळजबरीने उपदेश करतात, कोणी मध्यस्थीने उपदेश करतात.. कोणी लालचीमुळे पत घालवून बसतात. ज्याला विवेक सांगावा तो प्रतिकूल होतो आणि पुढे पुढे नष्ट करणारा कारभार होतो. भावाला भाऊ उपदेश देतो, पुढे पुढे त्याची फजिती होते म्हणून ओळखीच्या लोकांमध्ये महंतपणा मांडू नये. पहिले दिसतं पण नंतर नष्ट होतं.
अविवेकी असे तसे लोक मिळाल्यास विवेकी लोक ते कसे मान्य करतील? नवरा शिष्य आणि स्त्री गुरु हा देखील फटकळ विचार आहे. नाना भ्रष्टाचारी प्रकारासारखा तो आहे. प्रगट विवेक बोलता येत नाही म्हणून लोकांसमोर वेळ मारून नेतात. मुख्य निश्चायापर्यंत अनुमानाने जाता येत नाही. लहरीनुसार काहीतरी सांगतात, विवेक सांगता येत नाही ते दूरदृष्टीचे पूर्ण साधू नव्हेत. कोणाला काहीही मागू नये, भगवदभजन वाढवावं, विवेकाच्या बळाने लोकांना भजनाकडे लावावे. दुसऱ्यांचं मन राखायचं काम हे अतिशय कठीण आहे. स्वतःच्या इच्छेने स्वधर्म पालन ही लोकरहाटी आहे. आपण तुर्क गुरु केला शिष्य चांभार मिळविला आणि नीच यातीने समुदाय नासला. या भूमंडळावर ब्राह्मण मंडळी मिळवावी, भक्त मंडळी तयार करावी, संत मंडळी शोधावी. उत्कट भव्य तेच घ्यावे. मळमळीत अवघे टाकावे. या भूमंडळावर निस्पृहपणे विख्यात व्हावे. अक्षर बरं, वाचन बरं, अर्थ सांगणे चांगलं, गाणं, नाचणं, पाठांतर सगळं चांगलं. दीक्षा चांगली, मैत्री चांगली, तीक्ष्णबुद्धीचे राजकारण बरे. स्वतःला नानापरीने अलिप्त राखावे. हरी कथेचा अखंड छंद, सगळ्यांना लागे नामाचे आकर्षण, त्याचे प्रबोधन सूर्याप्रमाणे प्रकटते. दुर्जनाला मर्यादेत ठेवले, सजनाचे समाधान केले, सगळ्यांच्या मनाचे व्यापार तो जाणतो.
संगतीने मनुष्य बदलतो. उत्तम गुण तात्काळ प्रगट होतो. अखंड अभ्यासासाठी समाज तयार होतो. जिथे तिथे नित्य नवा, लोकांना वाटतं हा असावा परंतु लालचीच्या गोंधळात पडूच नये.उत्कट भक्ती, उत्कट ज्ञान, उत्कट चातुर्य, उत्कट भजन, उत्कट योग अनुष्ठान जागोजागी. उत्कट निस्पृहता धरली, त्याची कीर्ती सर्व दिशांना पसरली. उत्कट भक्तीने लोक संतुष्ट झाले. उत्कटता नसेल तर कीर्ती कदापि मिळणार नाही. उगाच वणवण हिंडून काय होते? देहाचा भरोसा नाही, वय केव्हा सरेल, कधी काय प्रसंग पडेल ते सांगता येत नाही; म्हणून सावधान असावं. होईल तितकं करावं भगवत कीर्तीने भूमंडळ भरावे. आपल्याला जे जे अनुकूल आहे ते ते तात्काळ करावं. जे होत नाही त्याचा विचार करावा. विचार केल्यावर ती सापडत नाही असं काहीच असत नाही; म्हणून एकांतामध्ये विवेकाद्वारे कल्पना करावी. अखंड व्यवस्था जिथे असेल तिथे काही कमी पडणार नाही. एकांत नसेल तर प्राण्याला बुद्धी काम देणार नाही. एकांतामध्ये बसून विचार करावा. आत्माराम ओळखावा. इथून तिथवर बाकी कशातच अर्थ नाही. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे बुद्धिवाद निरूपणनाम समास षष्ठ समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127