जय जय रघुवीर समर्थ. मागे करंटेपणाची लक्षणे सांगितली ती विचारपूर्वक संपूर्णपणे सोडून द्यावी. आता सुदैवी माणसाची लक्षणे ऐका. ती परम सौख्यदायक आहेत. शरीरामध्ये उपजत गुण असतात, नाना प्रकारे परोपकार करतो, सगळ्यांना मनापासून तो आवडतो. सुंदर अक्षर लिहिता येणे, शुद्ध चपळ वाचन, अर्थ निरूपण करता येणं हे सगळं सुदैवी पणाचे लक्षण आहे. कोणाचेही मन दुखवायचं नाही, चांगल्या व्यक्तींची संगत सोडायची नाही, अशा प्रकारची ही सुदैवीलक्षण म्हणजे चांगल्या माणसाची लक्षणे आहेत. हे लक्षात घ्यावे. सगळ्या जणांना हवाहवासा वाटतो, नित्य नवा विचार करतो, मूर्खपणामुळे गोंधळ करीत नाही. नाना उत्तम गुण असतात तोच सत्पात्र असतो तो मनुष्य जगाचा मित्र असतो. तो स्वतंत्र असतो. पराधीन नसतो. तो सगळ्यांचं मन राखतो. उदंड पाठांतर करतो. त्याला शहाणपणाचा विसर पडत नाही. नम्रपणाने विचारतो, प्रेमळपणाने अर्थ सांगतो. जस बोलतो तसंच उत्तम वर्तन करतो. तो अनेकांना मानतो. त्याला कोणी बोल लावू शकत नाही. असा तो पुण्यराशी महापुरुष असतो. तो परोपकार करण्यासाठीच राहतो तो सगळ्यांना हवे ते देतो. मग त्याला भूमंडळावर काहीही उणे पडत नाही. खूप जण त्याची वाट पाहतात. वेळप्रसंगी तात्काळ कामासाठी उभा राहतो. कोणाचंही उणेपण तो सहन करत नाही.
चौदा विद्या चौसष्ट कला, संगीत, गायन कला, आत्मविद्याचा जिव्हाळा त्याच्याकडे उदंड असतो. सगळ्यांशी नम्र बोलतो, सगळ्यांचे मन राखणे, कोणाला काही कमी पडू देत नाही. न्याय निती भजन मर्यादा याद्वारे नेहमी काळ सार्थक करतो, तेथे दरिद्रीपणाचे संकट कसे येईल? उत्तम गुणांनी शृंगारलेला असतो तो सगळ्यांमध्ये शोभतो. त्याचे प्रताप उगवलेल्या सूर्यासारखे प्रभावी असतात. जाणता पुरुष जिथे असेल तिथे कलह कसा निर्माण होईल? उत्तम गुणांविषयी त्यांना आदर नाही ते प्राणी करंटे. प्रपंचामध्ये राजकारण जाणतो, परमार्थामध्ये साकल्याने विवरण करायचं जाणतो, सर्वांमध्ये उत्तम गुण असतात त्याचा तो भोक्ता असतो. मागे एक पुढे असं तो करीत नाही. सर्वत्र तो सर्वांना सारखी वागणूक देतो. दुसऱ्याच्या मनाला धक्का लागेल असं वर्तन करू नका. नेहमी जिथे तिथे सगळीकडे विवेक प्रकट करा. कर्मविधी, उपासना विधी, ज्ञानविधी, वैराग्यविधी, विशाल ज्ञातृत्वाची बुद्धी, मग ती दूरकशी होईल? असे ? सगळ्यांच्या शरीरामध्ये आत्मा आहे त्याप्रमाणे सगळे उत्तम गुण असतील तर त्याला कोण वाईट म्हणेल?
आपल्या कार्याला लहान थोर लोक तत्पर असतात तसा त्यांच्यावर आपलंच कार्य समजून तो मनापासून परोपकार करतो. दुसऱ्यांच्या दुःखाने दुःख होते, दुसऱ्याच्या सुखाने सुखावतो. सगळेजण सुखी असावे अशी त्याची इच्छा असते. उदंड मुलं नाना असतात, वडिलांचे मन सर्वांवर असते तशी सगळ्यांची चिंता महापुरुष करतो. ज्याला कोणाचं अकल्याण सहन होत नाही. त्याची निष्कांचन वासना असते, धिक्कारला तरी त्याला धिक्कारला जात नाही तो महापुरुष असतो. मिथ्या शरीराची निंदा केली तरी याचं काय गेलं? देह बुद्धी असूनही स्वार्थरहित असल्याने त्याने सर्वांना जिंकलेले असते. उत्तम गुणांमुळे मनुष्य लक्ष वेधून घेतो, वाईट गुणांमुळे प्राण्याला दुःख होते. तीक्ष्णबुद्धी असली तरी लोक साधे असतील तर काय जाणतील? अत्यंत क्षमाशील असल्याची लोकांना प्रचिती येते मग लोक पाठीशी राहतात. आपण थोर असे अनेकांना वाटले पाहिजे. तरच त्याला धीर, उदार, महापुरुष म्हणता येईल. जितके काही उत्तम गुण ते समर्थाचे लक्षण. अवगुण म्हणजे करंटेपणाचे लक्षण, असं समर्थ सांगतात. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सदैव लक्षण निरूपण नाम समास चतुर्थ समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127