जय जय रघुवीर समर्थ. मागे लेखनाचे भेद सांगितले आता अर्थाचे भेद ऐका. नाना प्रकारचे संवाद समजून घ्यावे. शब्दभेद, अर्थभेद, मुद्राभेद, प्रबंध भेद नाना शब्दाचे शब्दभेद जाणून घ्यावे. नाना शंका, प्रत्युत्तरे, नाना उदाहरण त्यामुळे जगात असलेले चमत्कार स्पष्ट होतात. नाना पूर्वपक्ष, सिद्धांत, अनुभव पहावा. असंबद्ध बोलूच नये. अंदाजपंचे बोलू नये. प्रवृत्ती किंवा निवृत्ती प्रचिती नसेल तर सगळी भ्रांती. गारठ्यात अग्नी पेट घेत नाही त्याप्रमाणे कल्पनेने अनुभव दीप प्रकाशणार नाहीत. हेतू समजून उत्तर द्यायचं. दुसऱ्याच्या जीवाला समजून घ्यायचं ही चातुर्याची लक्षणे आहेत. चातुर्य नसताना खटपट म्हणजे ती फोलपट विद्या आहे.
सभेमध्ये खंडन मंडळाचा आटापिटा केला तरी समाधान कसे मिळणार? खूप बोलणं ऐकायचं तेव्हा मौन धरायचं. थोडक्यामध्ये लोकांचे मनोगत जाणून घ्यायचं. बाष्कळ लोकांमध्ये बसायचं नाही. उद्धट लोकांशी भांडण करायचं नाही. स्वतःसाठी लोकांचा समाधान नाहीसं करायचं नाही. नेणतेपणा सोडायचा नाही. आपण खूप जाणकार असे म्हणून अहंकाराने फुगायचे नाही. नाना लोकांचं हृदय मृदू शब्द बोलून उकलावे. प्रसंग नेटका जाणावा. खूप लोकांशी झुंज घेऊ नका. आपलं खरं असलं तरी सभा निरर्थक होते. तिचा फड होतो. शोध घेण्यात आळस करायचा नाही. भ्रष्ट लोकांमध्ये बसायचं नाही. बसलं तरी खोटे दोषारोपण करायचे नाही.
आर्त व्यक्तीचं मन शोधायचं, प्रसंगी थोडं वाचायचं पण चांगल्या माणसांना गोडी लावून सोडायचं. सभेमध्ये बसायचं नाही. मुक्तद्वार अन्नसंतर्पण असतं तिथे जायचं नाही. गेले तर आपलं जीवन ओशाळवाण होतं. उत्तम गुण प्रगट करायचे. मग इतरांशी बोलताना भले पाहायचं. मित्र शोधायचे. उपासनेनुसार बोलायचं. सर्व लोकांना संतुष्ट करायचं. सगळ्यांशी चांगलं राहायचं. ठाई ठाई शोध घ्यावा, माहिती घ्यावी मगच गावामध्ये प्रवेश करावा. लोकांशी जवळीकीने नात्यातल्या सारखं वागून बोलावं. उच्च नीच म्हणू नये. सगळ्यांचे हृदय सगळ्यांचं हृदय शांत करावं. कुठेच नाराज होऊ नये. जगामध्ये जगमित्र होऊन राहायचं असेल तर जिभेपाशी त्याचं सूत्र आहे. कुठेतरी सत्पात्र शोधून काढायचं. कथा होती तिथे जावे, दूर गरिबासारखं बसावं. तिथल्या सगळं गुपित जाणून घ्यावं. तिथे भले लोक आढळतील, व्यापक काय आहे तेही कळून येईल. हळूहळू तिथला सहवास वाढवायचा. त्यांच्यात सामील व्हायचे.
सगळ्यांमध्ये श्रवण विशेष आहे. श्रवणापेक्षा मनन महत्त्वाचे आहे. मननामुळे अनेक लोकांचं समाधान होतं. धूर्तपणाने सगळं जाणावं. मनाने मन ओळखावं. समजले नसताना उगाच कशासाठी कष्ट करून घ्यायचे? असा प्रश्न समर्थ विचारत आहेत. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे विवरण निरूपण नाम समास द्वितीय समाप्त.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127