(रत्नागिरी)
आदर्श आचारसंहिता सुरु झाल्यानंतर जिल्ह्यातील भरारी पथके ॲक्शन मोडवर काम करीत आहेत. जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी स्वत: हातखंबा येथील तपासणी नाक्यावर भेट देऊन वाहनांची तपासणी केली.
जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हाधिकारी श्री सिंह यांनी सर्व नोडल अधिकारी, विभाग प्रमुखांची बैठक घेऊन विशेषत: भरारी पथकांना सतर्क राहण्याबाबत सूचना दिल्या होत्या. गोवा बनावटीची दारु, नियमबाह्य रोकड याची वाहतूक होऊ नये, याबाबत वाहनांची कसून तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार आदर्श आचारसंहिता पथकाचे नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार, सहाय्यक नोडल अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी हातखांबा येथील तपासणी नाक्यावर भेट दिली. शिवाय, रत्नागिरीकडे येणाऱ्या वाहनांची तपासणी केली.