(रत्नागिरी)
जिल्ह्यात सायबर क्राईमचे वाढते गुन्हे पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी जनतेला आवाहन केले आहे की सायबर गुन्हेगारांपासून आपली आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी सावध रहा. यासाठी पुढील बाबींकडे काटेकोरपणे लक्ष देऊन ते पाळण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.
सध्या सायबर गुन्ह्यांची पद्धत पाहता सायबर गुन्हेगार हे शेअर/फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यावर दामदुप्पट परताव्याचे अमिष दाखवून पीडित व्यक्तींना पैसे पाठविण्यास भाग पाडल्याचे प्रकारदेखील समोर आलेले दिसून आलेले आहेत. तसेच सायबर गुन्हेगार हे पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी तसेच ई.डी. विभागाचे अधिकारी असल्याचे भासवतात तसेच बनावट पोलीस अथवा शासकीय विभागाचे बनावट ओळखपत्रे पाठवून, पीडित व्यक्तीला फोन केला जातो व पीडित व्यक्तीच्या आधारकार्डचा गैरवापर करुन त्याद्वारे बनावट सिम कार्ड खरेदी केले जाते व त्याआधारे फोन कॉल वरून “तुमच्या नावावर कोणीतरी बँक अकाऊंट सुरु केलेले आहे व त्यावर मनी लाँड्रींगचा पैसा जमा झालेला आहे व तुमच्या विरुध्द आता ईडी / शासकीय चौकशी लागणार असून तुमचे बँक अकाऊंट व प्रॉपर्टी सिझ करण्यात येणार आहे”, असे सांगितले जाते. तसेच हे प्रकरण मिटविण्याकरीता सायबर गुन्हेगार हे “तुम्ही पैसे द्या किंवा तुमचा सहभाग नसल्याचे सिद्ध करण्यासाठी तुमचे बँक अकाऊंट व्हेरीफाय करणे गरजेचे आहे व त्याकरीता काही रक्कम पाठवा. तुमचे व्हेरीफिकेशन झाल्यावर तुमचे पैसे परत पाठविले जातील” असे सांगून जनतेची आर्थिक फसवणूक करत असल्याचे समोर आलेले आहे.
तरी, सर्व नागरिकांनी सर्वच प्रकारच्या सायबर गुन्ह्यांपासून सावध राहणे आवश्यक आहे. कोणत्याही तातडीच्या शंका किंवा समस्यांसाठी, कृपया आमच्या सायबर पोलीस ठाणे हेल्पलाइन नंबर +९१८८३०४०४६५० वर संपर्क साधावा अथवा डायल- ११२ वर संपर्क साधावा.
तसेच सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्याकरीता आपण आपल्या मोबाईलवर आलेले अनोळखी कॉल व सोशल मीडियावर येणाऱ्या अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नयेत व अनोळखी व्यक्तींनी पाठविलेल्या लिंकवर क्लिक करु नये, असे आवाहनही जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.