(अलिबाग)
अलिबाग समुद्रकिनारी शनिवारी (३० नोव्हेंबर) रात्री एकाचा किरकोळ कारणावरुन खून करण्यात आला. मितेश जनार्दन पाटील असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. मितेश पाटील (वय २८) हा पेण तालुक्यातील गडब चिरबी येथील राहणारा आहे.
मितेश आणि त्याचा मित्र प्रथमेश पाटील (रा. गडब) हे दोघे शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अलिबाग समुद्र किनारी बियर पीत बसले होते. बियर पीत असताना मितेशच्या हातातील बियरची बाटली खाली पडून फुटली. त्याचा आवाज झाला. यावेळी तिथे शेजारी दारू पिण्यासाठी बसले होते. ओमकार भुकवार, वंट्या (पूर्ण नाव माहीत नाही) आणि आणखी तिघांचा यामध्ये समावेश होता.
बाटली फुटून आवाज झाल्याचा या पाचजणांना याचा राग आला. त्यांनी या दोघांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरूवात केली. यांच्या तावडीतून सुटण्यासाठी मितेश आणि त्याचा मित्र प्रथमेश यांनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पाचजणांपैकी एकाने मितेश याच्या पोटावर आणि खांद्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात मितेश गंभीररित्या जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पाचही जणांना ताब्यात घेतले आहे.