(रत्नागिरी)
तालुक्यातील आरे येथे अज्ञात कारणातून एकाने दोघांना हाताच्या बुक्याने आणि लोखंडी शिगेने मारहाण केली. ही घटना बुधवार, ११ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. सुमारास तेथील भैरी मंदिरा बाहेरील रस्त्यावर घडली होती. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे. आशिष नरेश कनगुटकर (वय ४०, रा. आरे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात नितिन धर्माजी शिवलकर (वय ५४, रा. आरे, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
बुधवारी सकाळी नितिन शिवलकर त्यांचे मित्र सुदेश रविंद्र कदम (वय ३८) हे दोघेही साखरतर येथे मच्छी आणण्यासाठी जात होते. तेव्हा संशयित आशिष कनगुटकरने त्यांना भैरीमंदिराबाहेरील रस्त्यावर थांबवून शिवीगाळ करत खिशातून आणलेली हातोडी काढून नितिन शिवलकर यांच्या पाठीवर मारली. त्यानंतर त्याने त्यांच्या डोक्यात हातोडी मारण्याचा प्रयत्न केला, तो शिवलकर यांनी चुकवला. सुदेश कदम यांना तू शिवलकर बरोबर फिरतोस तुला ठार मारुन टाकीन, अशी धमकी देत त्यांच्याही उजव्या हातावर, उजव्या पायावर हातोडी मारली. त्यानंतर संशयिताने बाजुच्या मंदिराच्या आवारात धावत जाऊन तेथील तुळशीजवळील लोखंडी शिग घेऊन दोघांना मारण्यासाठी धावून आला व ठार मारुन टाकेन, अशी धमकी दिली. याप्रकरणी संशयिताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्याते गुन्हा दाखल करण्यात आला आहे.