(क्रीडा)
बीसीसीआयने नुकतीच अंपायरिंगची ग्रुप ‘D’ ची परीक्षा घेतली आहे. अहमदाबादमध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेत १४० जणांनी सहभाग घेतला होता. पण बीसीसीआयच्या तीन गुगली प्रश्नांवर यातील तब्बल १३७ जणांची विकेट पडली आहे. यामुळे बीसीसीआयने अंपारिंगसाठी घेतलेल्या या कठिण परीक्षेत फक्त ३ जण पास होऊ शकले आहेत. ही परीक्षा कठीण म्हणून ओळखली जाते. या परीक्षेत जवळपास ३७ अवघड प्रश्न विचारण्यात आले होते.
या दरम्यान सर्व उमेदवारांची लेखी, व्हायवा, व्हिडीओ आणि शारीरिक चाचणी या प्रकारची परिक्षा घेण्यात आली. कोरोना महामारीमुळे यावेळी शारीरिक चाचणीचाही समावेश या परिक्षेत करण्यात आला होता. व्हिडिओ टेस्टमध्ये एका सामन्याचे फुटेज दाखवण्यात आले आणि विशिष्ट परिस्थितीत अंपायर म्हणून तुम्ही काय निर्णय घ्याल, असे प्रश्न प्रश्न विचारण्यात आले.
परीक्षेला बसलेल्या जवळपास सर्वच उमेदवारांनी प्रॅक्टिकलमध्ये चांगली कामगिरी केली, पण लेखी परीक्षेत मात्र प्रश्न पाहून सर्वांचीच दांडी गुल झाली.
लेखी परीक्षेतील काही प्रश्न असे होते –
१)- जर पॅव्हेलियनची किंवा झाड तसेच क्षेत्ररक्षकाची सवली खेळपट्टीवर पडत असेल आणि फलंदाजाने त्याची तक्रार केली तर तुम्ही काय कराल?
उत्तर : पॅव्हेलियन आणि झाडाच्या सावली फारशी विचारात घेतली जाणार नाही. मात्र क्षेत्ररक्षकाला स्थिर राहण्यास सांगितले जाईल नाहीतर चेंडू डेड बॉल म्हणून घोषित केला जाईल.
२) जर एखाद्या गोलंदाजाच्या हाताच्या तर्जनीला दुखापत झाली आहे. त्याने त्यावर पट्टी लावली आहे आणि पट्टी हटवली तर त्यातून रक्त येऊ शकते. अशावेळी तुम्ही गोलंदाजाला पट्टी हटवून गोलंदाजी करण्यास सांगाल का?
उत्तर : जर गोलंदाजाला गोलंदाजी करायची असेल तर त्याला हाताला लावलेली पट्टी काढावीच लागेल.
३) – एका वैध चेंडूवर एका फलंदाजाने एक फटका खेळला. तो फटका शॉर्ट लेगला उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हेलमेटमध्ये अडकला. बॉलमुळे हेलमेट खाली पडले, मात्र चेंडू खाली जमीनीवर पडण्याआधीच फिल्डरने तो कॅच केला तर फलंदाजाला तुम्ही बाद ठरवणार का?
उत्तर : नॉट आऊट दिला जाईल.
दरम्यान, बीसीसीआयने या परीक्षेतील अनेक प्रश्न अवघड असल्याचे मान्य केले आहे. मात्र बीसीसीआयने गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करणार नसल्याचेही सांगितले आहे.