(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील बसणी गावचा सुपुत्र प्रथमेश देवेंद्र पवार याची नवी दिल्ली येथे होणाऱ्या रथचित्र या कार्यक्रमात कलाकार म्हणून निवड झाली आहे. येत्या 26 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली लाल किल्ला येथे राजपथावर प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनात विशेष कार्यक्रमात तो सहभागी होणार आहे. प्रथमेश पवार याने बसणी येथील जी एम शेट्ये हायस्कूलमध्ये आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण मालगुंड येथील भाई मयेकर ज्युनिअर कॉलेजमध्ये घेतले.
त्याला शालेय आणि महाविद्यालयीन जीवनापासूनच अभिनयाची मोठी आवड होती. यावेळी आपल्या आवडीचे अभिनयामध्ये त्याने शालेय आणि महाविद्यालय स्तरावरील विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतल्यानंतर आपला ठसा उमटवला होता. त्यानंतर त्याने एक्टर, डायरेक्टर अशा स्वरूपात आपली भूमिका लोकांसमोर साकारत स्वतःच्या शॉर्ट फिल्म निर्माण केल्या. त्यामध्ये सात शॉर्ट फिल्म, तीन वेब सिरीज, एक थिएटर मूवी ,एक एबीपी माझा डॉक्युमेंट्री फिल्म,तीन सीरिअल्स,दोन एडवरटाईज, एक अपकामिंग मूवी फ्रान्स इन ऑल लँग्वेज मूवी तर दोन शॉर्ट फिल्म नव्याने रिलीज होणार आहेत. यातूनच त्याने अभिनयामध्ये आपली कौशल्यता निर्माण केली.
विशेष म्हणजे गणपतीपुळे येथे सुप्रसिद्ध अभिनेता तथा दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांच्या नवरा माझा नवसाचा भाग दोन चित्रपटामध्ये त्याला एका लहान भूमिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. आपल्या आवडीच्या असलेल्या अभिनय कलेबरोबरच कोकणातील विविध कला संस्कृतीची आणि पर्यटन स्थळांची माहिती जगभरात पोहोचण्याच्या उद्देशाने त्याने कोकण सफर नावाचे आपले यूट्यूब चैनल सुरू केले त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे . एकूणच या सर्व अभिनयाच्या कौशल्याची विशेष दखल घेऊन त्याची नवी दिल्ली येथे होणाऱ्या रथचित्र कार्यक्रमात कलाकार म्हणून निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे लाल किल्ल्याच्या राजपथावर 26 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात प्रथमेश आपला नवा उमटवणार आहे. या निवडीबद्दल प्रथमेशचे बसणी येथील जी एम शेट्ये हयस्कूलच्या शिक्षण संस्थेकडून आणि स्थानिक ग्रामस्थांकडून तसेच विविध स्तरातून विशेष अभिनंदन व कौतुक होत आहे.