गर्दीमध्ये कार आणि टू-व्हीलर चालवण्याची अनेकांना, विशेषतः नवीन नवीन गाडी शिकलेल्यांना भीती वाटणं साहजिकच आहे. ज्यांना रोजची सवय आहे त्यांना अशा नवशिक्यांचं कदाचित हसू येईल. पण भर गर्दीच्या रस्त्यात चहूबाजूंना असणारी माणसं आणि गाड्यांची गर्दी, मध्येच कोणतरी येतं, कोणीतरी फोनवर बोलत जात असतं, एखादा सिग्नल न देता वळतो, कोणीतरी ट्रॅफिक सिग्नल तोडून पुढे घुसतो, गाड्यांची कूर्मगती अशा परिस्थितीत नवीन गाडी शिकलेल्यांवर गर्भगळीत होण्याची पाळी येते. परंतु या परिस्थितीपासून सुटका नाही, विशेषतः महानगरात किंवा छोट्या शहरात राहणाऱ्यांची तरी या वाहतुकीला, गर्दीला तोंड देणं भागच आहे.
कार आणि टू-व्हीलर चालकांना उपयोगी असे हे काही मुद्देः
> चालकाचं डोकं आणि आरसा पाहाः समोरच्या गाडीचा चालक काय करतो आहे, याचा त्याच्या बाजूच्या आरशातून आणि समोर दिसणाऱ्या डोक्यावरून अंदाज बांधता येतो. काहीवेळा सिग्नल किंवा गर्दीत असताना तो चटकन उजवीकडे वळतो. त्यानंतर सिग्नल देतो. त्याच्या हालचाली पाहून हळूहळू अंदाज येत जातो. तसंच आपणही आपल्या गाडीच्या आरशांकडे पाहत राहावं. त्यातून मागे असलेल्या गाडीचा चालक काय करतो आहे, हे समजतं.
> ब्रेक्सकडे लक्ष द्याः ब्रेक दाबणं तसं काही अवघड नाही. नवे चालक काही वेळा ब्रेक दाबताना अडखळतात. गाडीचा वेग कमी होण्याऐवजी गाडी पटकन थांबते. त्याची त्यांना थोडी भीती वाटते; पण भीतीचं कारण नाही. ब्रेक किती जोरात, कसा दाबायचा याचा लवकर अंदाज येतो. त्यामुळे ब्रेक मारताना टेन्शन घेऊ नका.
> तुम्ही दिसत राहाः पावसाळ्यात हा मुद्दा महत्त्वाचा आहे. अंधारून आल्यानंतर आपले कपडे गडद असतील, तर इतर गाड्यांना आपण चटकन दिसणार नाही. पावसाळी फ्लोरोसंट रंगाचं जर्किन वापरा. हेल्मेटचा रंगही चटकन दिसेल असा असावा. अंधारामध्ये आपण इतर गाड्यांना दिसायला हवं, हे महत्त्वाचं. टू-व्हीलरला रिफ्लेक्टर आणि टेल लॅम्प असतात; पण कदाचित त्यावर चिखल उडलेला असू शकतो, हे लक्षात घ्यायला हवं.
> वाहतुकीचा वेग मंदावल्यास समोरच्या गाडीच्या उजवीकडे थांबा. त्यामुळे पुढे जाण्याचा मार्ग मिळेल. कार एकामागे एक थांबतात. टू-व्हीलर्सना त्यांच्या बाजूने जाणं शक्य असतं. त्यामुळे त्याचा अंदाज घेऊन थांबावं.
> गाडी चालवताना आजूबाजूचा परिसर नीट पाहा. काही वेळा मुख्य रस्त्याच्या बाजूने छोट्या छोट्या गल्ल्यांमधून अचानक वाहनं येतात. आधीच समोरचा अंदाज घेतलेला असला, की आपण सजग राहतो. पटकन ब्रेक दाबावा लागला तरी आपण त्यासाठी तयार असतो. टक्कर टळते. अर्थात, हे सारं समोरची वाहतूक, रस्ता, ट्रॅफिक हे सांभाळून करायचं असतं. हळूहळू तेही जमतं.
> रस्ता पाहाः टू-व्हीलर चालवताना हेही महत्त्वाचं असतं. काही वेळा रस्त्यावर तेल सांडलेलं असतं. पावसाळ्यात रस्ता निसरडा होतो. त्यामुळे त्याकडेही लक्ष द्यावं. बरेचदा समोरच्या गाड्या अचानक वळून, म्हणजे एखादा भाग टाळून पुढे जात असतात. त्या तशा जातात; कारण रस्त्यावर काहीतरी असतं. काही वेळा त्या गाड्यांच्या वळण्याकडे लक्ष न देता एखादा सरळ जातो आणि घसरतो. तेव्हा आजूबाजूच्या वाहनांवरूनही रस्त्याचा अंदाज बांधा.
> मोकळ्या जागेतून गाडी चालवाः गर्दीच्या वेळी कारच्या बाजूने टू-व्हीलर जाऊ शकते. त्या जागांचा नीट अंदाज घ्या. पुढे काही अडथळा नाही ना, हे पाहा. नाहीतर बाजूने जायचो आणि पुढे अडकायचो, असं होतं. जास्त ट्रॅफिक असल्यास उगाच इकडून-तिकडून जागा शोधण्याऐवजी प्रवाहाबरोबर पुढे जा.