(रत्नागिरी)
‘बा साहित्यपुरषां म्हाराजा, उबा र्हा.. आज व्हया टिकानी साहित्याची गुढी उबारलीली हाय.. साहित्याचा तोरानं बांदलीला हाय.. पुस्तकांची पुंजा केलीली हाय.. ती मान्य करून घे. वाचनान्याला ढिगभर पुस्तकाचा वाचयाची वांशा देस.. लिवनार्याच्या हातात ताकत देस.. बोलनार्याच्या त्वांडार सरस्वती नाचनं दे.. असा सगला बरा करून वडाची साल पिपलाक लाव.. उलट्याचा सरल कर.. अनी साहित्याची, वाचनाची गोडी लाव रे म्हाराजा..!’ असे संगमेश्वरी बोलीतील खणखणीत गार्हाणे साहित्यिक गुढीला घालण्यात आले. जनसेवा ग्रंथालयातर्फे पाचव्यावर्षी वाचन चळवळ आणि साहित्य चळवळ वाढीस लागावी, समृध्द व्हावी या हेतूने गुढीपाडव्याच्या पुर्वसंध्येला ग्रंथालयाच्या प्रांगणात साहित्यिक गुढी उभारण्यात आली होती. यावेळी हे गार्हाणे घालण्यात आले.जनसेवा ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी, कार्याध्यक्ष राहुल कुलकर्णी यांच्या यांच्या शुभहस्ते साहित्यिक गुढीचे पुजन आणि ग्रंथपुजन करण्यात आले.
अभिनव संकल्पना
यावेळी जनसेवाचे अमोल पालये यांनी साहित्यिक गुढी उभारण्यामागची संकल्पना स्पष्ठ केली. राजा शालीवाहनाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या पुतळ्यांमध्ये प्राण ओतले, अशी कथा आपण ऐकतो. वस्तुत: सहा हजार मातीच्या पुतळ्यात प्राण ओतले म्हणजे, दुर्बल, आत्मविश्वास गमावलेल्या, निर्जीव-चैतन्यहीन झालेल्या समाजात चैतन्य, स्वाभिमान, अस्मिता जागृत केली. असा या कथेचा अर्थ लावता येतो. हाच अर्थ अभिप्रेत धरून ही गुढी रत्नागिरीची साहित्य, वाचन चळवळ वाढीस लागावी यासाठी उभारली आहे. या गुढीची काठी ही लेखणीची प्रतिक आहे, आणि या गुढीचा गढू हा विचारांचा प्रतिक आहे. लेखणीतून चांगले साहित्य, चांगले विचार प्रसवावेत, ही या गुढीची संकल्पना आहे.
रत्नागिरीतील चित्रकार आणि जनसेवाचे वाचक श्रीनिवास सरपोतदार यांनी नेहमीप्रमाणे साहित्यिक गुढीचे आकर्षण ठरणाऱ्या साहित्य पताका यावर्षीही साकारल्या होत्या. यावर्षी पताकांवर नामवंत साहित्यिकांची नावे आणि त्यांची सुबक चित्रे त्यांनी स्वत: रेखाटली होती.
गुढीपुजनानंतर अमोल पालये यांनी साहित्यिक गुढीला साहित्यिक बोलीभाषेतून गार्हाणे घातले ‘..जनसेवावाल्यांनी आज साहित्याची गुडी उबी केल्यानी हाय पुस्तकांशी नाती सांगनारी ही सगली तुजी प्वारा-बाला, मुलामानसा, जनसेवाचं गावकरी, मानकरी, कामकरी आज तुमच्याम्होेर जमलीलं हायतं लोकानंला शिकून सवरून शानीसुरती करयाचा तेंनी वसा घेतलांनी हाय.. उतनार नाय, मातनार नाय.. घेतला वसा टाकनार नाय.. आशी पदराला गाट बांदून आज जनसेवालं साहित्याची, पुस्तकांची, लोकांची शेवा करीत आलीलं हायतं तेंच्या कारयात तेंनला यास देस.. वाचकांचो आशीरवाद तेंनला भरभरानं मिलानं दे.. तेंचा पिरेम तेंनला लाभानं दे.. वाचकांचो आनी तेंचो गोडीगुलाबेंचो सवसार नांदू दे.. इचार-इचारांनी ती सगली मंडली यकटयं नांदून वाचनसंस्कृतीची गुढी गगनात फडकानं दे रं साहित्यपुरषा म्हाराजा..’ अशा या गार्हाण्याला उपस्थितांनी दाद दिली.
त्यानंतर ग्रंथालयात लावण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन ग्रंथालयाचे श्री. पुरोहित यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला लेखक सु.द.भडभडे, श्री.नानीवडेकर, श्रीमती लिमये, ग्रंथपाल सिनकर, सुजाता कोळंबेकर, सौ.भोसले, मेघा कुलकर्णी, आदि. नागरिक, वाचक, सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिर्याबंदर रिक्षा व्यावसायिकांनी अपार मेहनत घेतली.