(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यांतील जयगड परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वी वायू गळतीची घटना घडलेली असतानाच जिंदाल कंपनीकडून गॅस टर्मिनलसाठी परवानगी दिली जात आहे.या पार्श्वभूमीवर जयगड परिसरातील नांदिवडे गाव व परिसरातील ग्रामस्थ मोठया प्रमाणात आक्रमक झाले असून राजकीय पक्ष बाजूला ठेऊन एकजुटीने संघर्ष करणार असल्याची भूमिका घेण्यात आली आहे. याबाबत जयगड नांदिवडे येथील प्रदूषण विरोधी संघर्ष समिती समितीने जयगड परिसरात जनजागृती सभा घेण्यास सुरुवात केली असून या सभेमध्ये संघर्ष समितीसमोर स्थानिक ग्रामस्थांकडून विविध मुद्दे उपस्थित केले जात आहेत. त्यामध्ये जिंदाल कंपनीकडून लोकवस्तीमध्ये कोणत्या निकषाच्या आधारावर शासनाच्या अधिकाऱ्यानी गॅस टर्मिनल उभारायला परवानगी दिली. हे कंपनीने आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लोकांपुढे मांडावे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
नांदिवडे माथ्यावर उभारत असलेल्या गॅस टर्मिनल प्रकल्प विरोधात प्रदूषण विरोधी संघर्ष समिती नांदिवडे रत्नागिरी ने नांदिवडे तसेच परिसरातील जयगड, सांडेलावगण, कासारी, संदखोल, चाफेरी तसेच वाटद परिसरापर्यंत जनजागृती करण्याचे काम सुरू केले आहे. या सभांमध्ये नांदिवडे अंबुवाडी व पहिले अंबू आणि सांडेलावगण वाकणवाडी या ठिकाणी जनजागृती सभा घेण्यात आल्या आहेत. या सभांमध्ये संबंधित गावातील सर्व जनतेने गॅस टर्मिनल प्रकल्पाला १०० % विरोध दर्शविला. हा गॅस टर्मिनल भर लोक वस्तीत कोणत्या निकषाच्या आधारावर जिंदाल कंपनी राबवत आहे. कंपनीने कोणाकोणाला विकत घेतलं आहे, असे अनेक प्रश्न लोकांनी उपस्थित केले.
सदर प्रकल्प लोकवस्तीमध्ये उभारू नये यापासून परिसरातील माणसांना तसेच प्राणी, जनावर, पक्षी या सर्वांचे जीवन धोक्यात आले आहे. तेव्हा हा प्रकल्प निर्मनुष्य वस्तीत किंवा एखाद्या वाळवंटात करावा, असे अनेक मुद्दे लोकांनी सभेत उपस्थित केले. त्यामुळे गॅस प्रकल्प हटाव मोहिमेमध्ये संघर्ष समिती व परिसरातील जनता एकजुटीने लढणार असे लोकांनी ठरवून जणू विडाच उचलला आहे.
या जनजागृती सभेला खंडाळा येथील अभ्यासू युवा सामाजिक प्रथमेश गवाणकर यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी या सभेमध्ये संघर्ष समिती अनेक समस्या व लोकांवर होणारे अन्याय शांततेने व कायदेशीर मार्गाने हाताळणार असल्याची भूमिका घेण्यात आली.