(पुणे)
राज्याचे उद्योग व मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यांना अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. या सन्मानाने भावूक होत उदय सामंत यांनी आपल्या आई-वडिलांची इच्छा पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली. अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या विशेष दीक्षांत समारंभात मंत्री उदय सामंत यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. या सोहळ्याला विद्यापीठाचे संस्थापक डॉ. अजिंक्य डी.वाय. पाटील, विद्यापीठाचे अधिकारी, विद्यार्थी आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉक्टरेट मिळाल्यानंतर झालेल्या सत्कार समारंभात बोलताना उदय सामंत म्हणाले की, आजपासून माझ्या नावासमोर ‘डॉ.’ लागले आहे. माझ्या आई-वडिलांची इच्छा होती की, मी एमबीबीएस करून डॉक्टर व्हावे, पण नियतीने मला वेगळ्या मार्गावर आणले. समाजासाठी आणि राज्यासाठी कार्य करताना आज विद्यापीठाने माझ्या कार्याची दखल घेतली, याचा मला अभिमान वाटतो, असे सांगताना उदय सामंत यांनी आपल्या भाषणात राजकीय प्रवासाचा आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख केला. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या मंत्रिपदाच्या काळात त्यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांची आठवण त्यांनी करून दिली.
उदय सामंत यांच्या नेतृत्वामुळे शिक्षण, रोजगार, ग्रामीण विकास, आणि कोकणातील प्रकल्पांना प्राधान्य मिळाले आहे. त्यांनी राज्याच्या राजकारणात मोठ्या ताकदीने आपली ओळख निर्माण केली असून लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या मतदारसंघातील जनतेचा विश्वास कायम ठेवला आहे. उदय सामंत यांचे सामाजिक योगदान त्यांच्या राजकीय कारकिर्दीइतकेच महत्त्वाचे आहे. त्यांनी लोकांच्या दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी, सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी, आणि लोकशाही प्रक्रियेत सामान्य नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी विविध प्रकारे काम केले आहे. त्यांचे सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानही महत्त्वपूर्ण आहे. ते समाजातील विविध संस्कृतींचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी कायम सक्रिय असतात. कोकणातील स्थानिक वारसा आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले आहे. त्यांच्या अशा सामाजिक सांस्कृतिक, राजकीय कामांची दखल घेऊन त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली.
उद्योग मंत्री म्हणून महाराष्ट्रात रोजगार निर्मितीवर भर देत असल्याचे सांगत त्यांनी पंधरा लाख सत्तर हजार कोटींचे गुंतवणूक करार (MOU) केले असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि परदेशी विद्यार्थ्यांना मराठी शिकवण्यासाठी अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाबरोबर विशेष अभ्यासक्रम सुरू करण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. माझी इच्छा आहे की, परदेशातील मराठी मुलांना मातृभाषेचा अभिमान वाटावा आणि ती सहज शिकता यावी. यासाठी विद्यापीठाबरोबर लवकरच पाऊले उचलली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी विद्यापीठ प्रशासनाचे आणि संस्थापक अजिंक्य डी.वाय. पाटील तसेच डी.वाय पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले. “या विद्यापीठाने आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण आणि संस्कार दिले आहेत. अशा प्रतिष्ठित संस्थेकडून सन्मान मिळणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे,” असे उदय सामंत यांनी नमूद केले.
राजकारणाची पार्श्वभूमी नसताना, तसंच घरात कोणीही साधं ग्रामपंचायत सदस्यही नसताना आपण हे यश गाठू शकलो कारण राज्यातील आणि रत्नागिरीतील जनता माझ्या पाठीशी होती अशी आठवण सांगताना आपण ज्या क्षेत्रात काम कराल त्या क्षेत्राचं नावलौकिक आपल्यामुळे वाढलं पाहिजे या भावनेतून काम करा असा संदेश ही उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना दिला.