(रत्नागिरी)
राज्य परिवहन महामंडळाच्या आयुर्मान संपलेल्या गाड्यांचे स्पेअर पार्ट्स व अन्य साहित्य बाजूला काढून गाड्यांच्या सांगड्यांचा लिलाव करण्यात आला आहे. रत्नागिरी विभागीय कार्यशाळेत एकूण चार कोटी रुपयांचा लिलाव करण्यात आला असून, शुक्रवारी भंगारात काढलेले साहित्य कार्यशाळेतून हलविण्यात आले.
सततच्या वाहतुकीमुळे एसटी नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे, तसेच स्टील/लोखंडापासून एसटीचा सांगडा बनविण्यात आल्याने ऊन, पावसामुळे तो गंजतो. त्यामुळे एसटीचे आयुर्मान १५ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. आयुर्मान संपलेल्या गाड्या वापरातून बाजूला काढल्या जातात. भंगारात किंवा लिलावासाठी काढण्यापूर्वी त्या गाडीतील उपयुक्त व सुस्थितीतील साहित्य बाजूला काढले जाते. त्यामध्ये टायर, पत्रा, सीट्स, विविध स्पेअरपार्ट्स, खिडक्या, दरवाजे, यंत्र बाजूला काढले जातात. वापरासाठी कालबाह्य झालेल्या साहित्याची लिलाव पद्धतीने विक्री केली जाते.
लिलावाची सर्व प्रक्रिया पूर्ण
रत्नागिरी विभागीय कार्यशाळेमध्ये डिसेंबरमध्ये चार कोटी रुपयांचा ऑनलाइन लिलाव करण्यात आला होता. लिलावाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे लिलाव घेणाऱ्या कंपनीच्या संचालकांनी सर्व भंगाराचे साहित्य शुक्रवारी उचलण्यास प्रारंभ केला आहे.