(नवी दिल्ली)
आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यापासून दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण यावर चर्चा सुरू होत्या. अखेर आम आदमी पक्षाने एकमताने आतिशी मार्लेना यांची दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून निवड केली.
या निवडीनंतर अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी दिल्लीचे नायब राज्यपाल (एलजी) विनय कुमार सक्सेना यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला. त्यानुसार विनय कुमार सक्सेना यांनी बुधवारी केजरीवालांच्या राजीनाम्यासह नव्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या शपथविधीसाठी २१ सप्टेंबर या तारखेचा प्रस्तावही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवला आहे. राष्ट्रपतींकडून हिरवा कंदील मिळताच आतिशी मार्लेना येत्या शनिवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची दाट शक्यता आहे. अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला व आतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव मुख्यमंत्रीपदासाठी ठेवला. यावेळी त्यांच्यासोबत कॅबिनेट मंत्री गोपाल राय, कैलाश गेहलोत, इम्रान हुसेन, सौरभ भारद्वाज उपस्थित होते.
आतिशी मार्लेना २०१३ मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्या आम आदमी पक्षाच्या संस्थापक सदस्यही आहेत. मार्लेना आपच्या ज्येष्ठ नेत्या व सामाजिक कार्यकर्त्या म्हणून परिचित आहेत. आतिशी २०२० मध्ये दिल्लीतील कालकाजी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी दिल्लीच्या शिक्षण मंत्रालयासह सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन मंत्री म्हणूनदेखील काम केले आहे.
याचे वाईट वाटते…..
केजरीवाल यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला आमदार केले, मंत्री केले आणि आता मला मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, पण आज मी जेवढी आनंदी आहे त्यापेक्षा जास्त दुःखी आहे. माझे मोठे बंधू अरविंद केजरीवाल, दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री राजीनामा देत आहेत याचे वाईट वाटते. दिल्लीचा एकच मुख्यमंत्री आहे आणि त्या मुख्यमंत्र्याचे नाव आहे अरविंद केजरीवाल, अशी प्रतिक्रिया आतिशी मार्लेना, (मंत्री, आम आदमी पक्ष) यांनी दिली आहे.