(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर पोलिसांनी गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारी इनोव्हा कार मुबंई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तुरळ येथे पकडली. इनोव्हा गाडीसह 6,69,920 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी चेतक भरत वाळवे (वय 29 वर्षे राहणार तिवरे डांबरे,वाळवेवाडी, तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई आज सोमवार 25 नोव्हेबर 2024 रोजी पहाटे 2.30 च्या सुमारास करण्यात आली.
चेतक भरत वाळवे हा त्याच्या ताब्यातील टोयाटो कपंनीची इनोव्हा गाडी क्रमांक MH01/AC/5668 मधून गोवा बनावटीचे दारू असलेले 118 बॉक्स विनापरवाना घेऊन गोवा येथून मुबंई च्या दिशेने जात असताना त्याला चिपळूण येथे पोलिसांनी थांबवण्याचा इशारा केला असता, चालक चेतक भरत वाळवे याने तेथे न थांबता फिल्मी स्टाईलने तेथून पुन्हा त्याच्या ताब्यात असलेली दारू वाहतूक करणारी इनोव्हा गाडी रत्नागिरी च्या दिशेने सुसाट वेगात पळ काढताच याची माहिती चिपळूण पोलिसांनी संगमेश्वर पोलिसांना देत त्यांनीही तशाच फिल्मी स्टाईलने त्या गाडीचा पाठलाग सुरु केला व मुबंई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तुरळ नाका येथे संगमेश्वर पोलिस तसेच चिपळूण पोलिसांनी अडवत त्याला मुद्देमालसह ताब्यात घेण्याची कामगिरी केली.
या गाडीत गोल्डन एसी ब्लु व्हिस्की चे 750 मिली च्या 70 बॉक्स मध्ये 840 बाटल्या,गोल्डन एसी ब्लु व्हिस्की 180 मिली मापाच्या 29 बॉक्स मध्ये 1392 बाटल्या, गोल्ड एन्ड ब्लॅक ×××रम 750मिली च्या 5 बॉक्स मध्ये 60 बाटल्या,गोल्ड एन्ड ब्लॅक ×××रम 180 मिली च्या14 बॉक्स मध्ये 672 बाटल्या असलेली गोवा बनावटीचे दारू चे बॉक्स व ते विनापरवाना वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली टोयटो कंपनीची इनोव्हा गाडी असा सुमारे 6,69,920 रुपये किमतीचा मुद्देमाल व पोलिसांना हुलकवणी देऊन पळून जाणाऱ्या चेतक वाळवे याला ताब्यात घेतले. सदर कामगिरी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी, चालक जाधव, पोलीस कॉन्सटेबल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल गाजरे, चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार एस. आर. शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल एस. एस. देशमुख,पोलीस कॉन्स्टेबल एस. एल. मिसाळ, चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल एम. एच. केतकर यांनी केली.