(गणपतीपुळे / वैभव पवार )
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रींच्या मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे माघी गणेशोत्सवाचे आयोजन 30 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या कालावधीत संस्थान श्री देव गणपतीपुळेच्या वतीने करण्यात आले होते. या माघी गणेशोत्सवाची सांगता मंगळवारी 4 फेब्रुवारी रोजी रथसप्तमीला महाप्रसादाने करण्यात आली. या महाप्रसादाचा लाभ सुमारे 3200 भाविक व स्थानिक ग्रामस्थांनी घेतल्याची माहिती संस्थान श्री देव गणपतीपुळेच्या वतीने देण्यात आली. तसेच करमणुकीच्या सांगता कार्यक्रमात आज रात्री ठीक दहा वाजता गणपती मंदिरासमोरच्या भव्य रंगमंचावर श्री गणेश प्रासादिक नाट्य मंडळ गणपतीपुळे यांच्या वतीने आचार्य अत्रे लिखित धमाल विनोदी नाटक मोरूची मावशी सादर करण्यात येणार आहे.
येथील स्वयंभू श्रींच्या मंदिरात ३० जानेवारी ते 4 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या माघी गणेशोत्सवामध्ये श्रींची महापूजा व प्रसाद, गणेशयाग देवता स्थापना, सामुदायिक आरती व मंत्रपुष्प, दररोज किर्तनमाला त्यामध्ये नागपूर येथील कीर्तनकार ह. भ. प .श्री .मोहन बुवा कुबेर यांची सुश्राव्य कीर्तने, कलशारोहण वर्धापन दिनानिमित्त गणेशयाग पूर्णाहूती, माघी यात्रा व श्रींची गणपती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गे पालखी मिरवणूक, सहस्त्र मोदक समर्पण तसेच करमणुकीच्या कार्यक्रमांमध्ये श्री. कुणाल भिडे प्रस्तुत ‘स्वरसंध्या’ हा गायनाचा कार्यक्रम आणि आचार्य अत्रे लिखित श्री गणेश प्रासादिक नाट्य मंडळ गणपतीपुळे सादरकर्ते ‘मोरूची मावशी’ हे धमाल विनोदी नाटक असे विविध कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर मंगळवारी 4 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी दोन या वेळेत महाप्रसादाने संपूर्ण माघी गणेशोत्सवाची सांगता गणपती मंदिरात करण्यात आली.
यावेळी महाप्रसादाचा लाभ स्थानिक ग्रामस्थ व भाविकांना अतिशय नियोजनबद्ध देण्याच्या कामी संस्थान श्री देव गणपतीपुळेची सर्व पंच कमिटी, मुख्य पुजारी व सर्व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. या महाप्रसादाचा लाभ स्थानिक ग्रामस्थांबरोबरच विविध ठिकाणाहून आलेल्या भाविक, पर्यटक व सहलीच्या विद्यार्थ्यांनी अधिक प्रमाणात घेतल्याची माहिती संस्थान श्रीदेव गणपतीपुळेकडून देण्यात आली.