( संगमेश्वर )
घरची परिस्थिती तशी बेताचीच, वडील आजारी असल्यामुळे रिक्षा चालवू शकत नाहीत, अशा स्थितीत चार जणांच्या कुटुंबाची तजवीज करण्यासाठी बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विघ्नेशने पेट्रोल पंपामध्ये नोकरी धरली. लहानग्या वयातच तो घरातील कर्ता पुरुष झाला; पण नियतीला हे पाहवले नाही आणि बुधवारी, दि. ३ जुलैला अपघातात विघ्नेशचा मृत्यू झाला.
संगमेश्वर तालुक्यातील तुरळ हरेकरवाडीतील २१ वर्षीय विघ्नेश आत्माराम करंडे आपल्या छोट्याशा खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी पेलत होता; पण त्याच्या या अकाली मृत्यूमुळे आता करंडे कुटुंबाचा मोठा आधारच हरपला आहे. त्यामुळे अनेकांची मने हेलावली आहेत. आपल्या परिस्थितीवर मात करून अनेकजण आपल्या घरचा गाडा ओढत असतात. आलेल्या संकटांना न घाबरता, कुरकुर न करता आयुष्य सुकर करण्याचा प्रयत्न करतात. तसाच प्रयत्न विघ्नेशही करीत होता. त्यातून ते कुटुंब स्थिरावत होते; पण काळाने घाला घालून त्याला हिरावून नेले.
विघ्नेशने १२ वीपर्यंतचे शिक्षण तुरळ येथे घेतले. चार वर्षांपूर्वी वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रिक्षा व्यवसाय पुढे चालवणे अशक्यप्राय झाले. वडिलांची तब्येत ठीक नसल्याने आणि घरी कमावते कोणीच नसल्याने त्याने पुढचे शिक्षण घेतले नाही. त्यानंतर घरची सगळी जबाबदारी अगदी लहान वयात विघ्नेशने आपल्या खांद्यावर घेतली. धामणी येथे एका पेट्रोल पंपावर काम करून विघ्नेश आपले घर चालवत होता. त्याला आता त्याची लहान बहीणही औषध दुकानात नोकरी करून सहाय्य करू लागली होती. सगळ्या परिस्थितीवर मात करून घर अगदी सुरळीत चालवण्याच्या त्यांच्या धडपडीला यश मिळत होते; मात्र बुधवारी, दि. ३ जुलै रोजी बोलेरो जीपच्या धडकेने विघ्नेशच्या दुचाकीला उडवले आणि होत्याचे नव्हते झाले. शांत, संयमी, मनमिळाऊ असा विघ्नेशचा स्वभाव होता. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे अनेकांना चटका लागला आहे.