(राजापूर)
कोकण रेल्वे मार्गावरील राजापूर तालुक्यातील सौंदळ येथील हॉल्ट स्थानकाचे थांबा क्रॉसिंग स्थानकात रुपांतर करण्याबाबतचे आश्वासन कोकण रेल्वे प्रशासनाने देऊन मोठा कालावधी लोटला तरी पुढील काहीच हालचाल न झाल्याने त्या आश्वासनाचे काय झाले, असे सवाल आता तालुक्याच्या पूर्व परिसरवासीयांमधून उपस्थित केले जात आहेत, तर सौंदळ येथील हॉल्ट स्थानकात सार्वजनिक स्वच्छतागृहासह खराब बनलेला रस्त्यासह अन्य समस्या कायम असल्याने प्रवाशांना मात्र गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
गेल्या काही वर्षांत कोकण रेल्वेमध्ये अनेक सुविधा उपलब्ध झाल्या. बरेच बदल झाले अत्याधुनिक सेवा मिळाल्या. विद्युतीकरण वेगाने झाले. मात्र, दुसरीकडे सौंदळ येथील हॉल्ट स्थानकाबाबत गेल्या काही वर्षात आवश्यक अशा सुधारणा झालेल्या नसल्याचे वास्तव अधोरेखीत ठरले आहे.
कोकण रेल्वे मार्गावर बहुतांशी राजापूर तालुक्याला सोयीचे ठरेल अशा सौंदळ येथे थांबा मिळावा, अशी सातत्याने मागणी तालुक्याच्या पूर्व परिसरातून होत होती तालुकावासीयांच्या सुदैवाने कोकणचे सुपुत्र असलेले तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सौंदळ रेल्वे स्थानकावर हॉल्टला मान्यता दिली होती आणि वर्षभरातच सौंदळ हॉल्टचे काम मार्गी लागून त्याचे उद्घाटनही प्रभू यांच्या हस्ते पार पडले होते.
मागील काही वर्षात सौंदळचे कायमस्वरूपी स्थानकात रुपांतर करण्यात यावे, अशी सातत्याने मागणी होत असून हे स्थानक कसे उपयुक्त ठरेल ते विस्तृतपणे कोरे प्रशासनाच्या निदर्शनाला आणून देण्यात आले आहे. त्यानुसार सौंदळचे हॉल्ट स्थानकातून कॉसिंग स्थानकामध्ये रूपांतरण करण्यात येईल, असे लेखी अश्वासन देण्यात आले आहे. मात्र त्याला बराच कालखंड उलटला तरी कोरे प्रशासनाने त्याबाबत काहीच निर्णय घेतलेला नसल्याचे दिसत आहे. काय झाले त्या आश्वासनाचे असा सवाल आता जनतेतून विचारला जात आहे. संबंधित कोरे प्रशासनाला त्या आश्वासनाची आठवण करून द्या, अशीही मागणी होऊ लागली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर राजापूर रोड स्थानक हे एकमेव स्थानक आहे त्यानंतर सौंदळ हॉल्ट स्थानक सुरु करण्यात आले आहे विस्ताराने मोठ्या असलेल्या राजापुर तालुक्यासाठी कोरे मार्गावर कमी स्थानके आहेत. लगतच्या लांजा तालुक्यात तर तीन परीपूर्ण स्थानके आहेत. सौंदळ हे मध्यवर्ती असल्याने बहुतांशी तालुक्यासाठी तसेच बाजुबाजुच्या तालुक्यांसाठी उपयुक्त ठरेल, असे ठिकाण आहे. येथे कायमस्वरुपी स्थानक उभारल्यास तालुक्यासाठी ते फायद्याचे ठरणार आहे. मात्र असे असताना संबंधीत कोरे प्रशासन मात्र सौदळ येथील हॉल्ट स्थानकाचे कायमस्वरूपी स्थानकात रूपांतर करण्यासाठी उदासीनता दाखवीत आहे, असे आरोप पूर्व तालुक्याच्या जनमानसातून होत आहेत. भविष्यात सौंदळ येथे कायमस्वरूपी स्थानक झाल्यास बहुतांशी तालुक्यांसह आजुबाजूला असलेल्या अन्य तालुक्यांना उपयुक्त ठरणार आहे.