(पुणे)
बदलापूर बाललैंगिक प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणी मानवाधिकार कार्यकर्ते व ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. एन्काऊंटर हा सर्वोच्च न्यायालयाच्या मते खून असल्याचे सांगत ॲड. सरोदे यांनी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर कारवाईविषयी संशय व्यक्त केला.
ॲड सरोदे म्हणाले, अक्षय शिंदे मारला गेल्याचे वाईट वाटत नाही. मात्र, त्याला शिक्षा न्यायालयीन प्रक्रियेतून व्हायला हवी होती. ती झाली असती तर बदलापूरमधे जो प्रकार घडला तो इतर कुठे घडू नये यासाठी गाईड लाईन्स आणि नियम तयार करता आले असते. त्यामुळे अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाची न्यायाधीशांच्या निगराणीखाली चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करणार आहे. ॲड. सरोद म्हणाले, अक्षय शिंदेचे एन्काऊंटर करून या प्रकरणातील इतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. शाळेच्या व्यवस्थापनातील लोक हे भाजप आणि आरएसएसच्या संबंधित आहेत. त्यांच्यावर कारवाई होऊ नये, यासाठी हा एन्काऊंटर करण्यात आला. तसेच, शाळेच्या व्यवस्थापनातील इतरांवर कारवाई करण्याची मागणी पीडित मुलींच्या नातेवाइकांनी सोडून द्यावी, यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आम्ही इतर आरोपींवर कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही सरोदे यांनी स्पष्ट केले.