(रत्नागिरी)
भंडारी समाजातील ग्रामीण टॅलेंटचा शोध घेवून त्यांना पुढे आणण्याचे काम रत्नागिरी तालुका भंडारी समाजाने करायला हवे. आजच्या तरूण पिढीला योग्य समुपदेशनाची गरज आहे. आयएएस, आयपीएस, एमपीएससी सारख्या स्पर्धा परिक्षाची त्यांना तयारी करता यावी म्हणून एक वेगळा आर्थिक फंड उभारायला हवा. असे सांगतानाच लवकरच भंडारी समाजात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी रत्नागिरी भंडारी महाअधिवेशन घेणार असल्याची घोषणा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या ट्रस्ट बोर्डचे विदयमान चेअरमन तथा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर यांनी येथे बोलताना केली.
रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचा विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम रत्नागिरीतील कित्ते भंडारी हॉलमध्ये संपन्न झाला. यावेळी अध्यक्षीय भाषणात त्यानी ही घोषणा केली. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ उद्योजक प्रसन्नशेठ आंबुलकर, मत्स्य उद्योजक सुनिलशेठ भोंगले, निवृत्त तहसिलदार राजेंद्र बिर्जे, निवृत्त डीवायएसपी विलास भोसले, भागेश्वर मंदीर ट्रस्टचे विश्वस्त ऍड. विनय आंबुलकर, श्रीवर्धन भंडारी समाजाचे संदेश मयेकर, संघाचे अध्यक्ष राजीव कीर, आ.रा.स. ऍकडमीचे ऍड.सत्वे, आणि गुणगौरव सोहळयाचे प्रमुख तथा संघाचे उपाध्यक्ष कांचन मालगुंडकर उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री.पेडणेकर म्हणाले की, भंडारी समाज दर्यावदी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे पहिले प्रमुख मायनाक भंडारी हे होते. आपल्या समाजाचा गौरवशाली इतिहास तरूणांनी वाचायला हवा. सागरी क्षेत्राशी निगडीत उद्योग, व्यवसाय आणि शासकीय सेवा यासाठी प्रयत्न करायला हवेत.
या कार्यक्रमात दानशूर भागोजी शेठ कीर स्मृतिवहीचे अनावरण आशिष पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळालेले राजन भाटकर आणि संजय पिलणकर, लायन्स क्लबचे नूतन अध्यक्ष सुप्रसिध्द हॉटेल व्यावसायिक गणेश धुरी, सामाजिक कार्यकर्ते सदानंद मयेकर, मुंबई – गोवा महामार्गावर बसला आग लागल्यानंतर प्रवाशांचे प्राण वाचवणार्या आर्यन अमित भाटकर यांचा सन्मानचिन्ह, सोनचाफ्याचे झाड व वहीसेट देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात ५ वी ८वी शिक्षवृत्ती मिळविलेल्या , १० वी मध्ये ७५% पेक्षा अधिक गुण आणि १२ वी मध्ये ७०% पेक्षा अधिक मार्क्स मिळवलेल्या व पहिल्या श्रेणीत पदवीधर झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. रत्नागिरीतील आ.रा.स. अकॅडमीचे ऍड. राकेश सत्वे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांबाबत बहुमोल मार्गदर्शन केले आणि पुढील २-३ वर्षात भंडारी समाजातील स्पर्धा परीक्षा पास होवून त्यांचा या ठिकाणी सत्कार होईल असे आश्वस्त केले. निवृत्त डीवायएसपी विलास भोसले यांनी समाजासाठी मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तक लायब्ररी समाजामार्फत सुरू करण्याचा मानस असल्याचे बोलून दाखविले त्यासाठी लागेल ते सहकार्य करण्याचे अभिवचन दिले.
प्रास्ताविकात संघाचे अध्यक्ष राजीव कीर यांनी दानशूर भागोजीशेठ कीर यांच्या जीवनावरील धडा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश करण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न आणि भविष्यातील भंडारी समाजाचा वेध याबात माहिती दिली. भर पावसात रेड अलर्ट असतानाही भंडारी समाज संघाच्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या गर्दीचा पूर दिसून आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मयेकर, संघाच्या उपाध्यक्षा ऍड. प्रज्ञा तिवरेकर, सहसचिव अमृता मायनाक यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव चंद्रहास विलणकर यांनी केले. विद्यार्थी, पालक आणि समाज बंधू भगिनी यांनी एकत्र भोजन करुन कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे सर्व सदस्य, महिला मंडळ, आजीव सभासद, हितचिंतक व देणगीदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.