(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यातील कडवई तुरळ रस्त्याची पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दुरावस्था झाली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या रस्त्याचे काम मार्च महिन्यात सुरू झाले खरे परंतु या कामाला फारशी गती नव्हती.साईड पट्ट्या व खडीकरण होईपर्यंत जून महिना उजाडला त्यानंतर डांबरीकरणाला सुरूवात झाली.पाऊस पडत असल्याने डांबरीकरण झाल्यास रस्ता टिकणार नाही हे लक्षात घेऊन रिक्षा चालक मालक संघटना अध्यक्ष मिलिंद चव्हाण, माजी सरपंच वसंत उजगावकर, उपसरपंच दत्ताराम ओकटे यांनी ठेकेदाराची भेट घेत काम बंद करायला लावले तरीही काही ठिकाणी काम केले जात होते. मात्र विरोध वाढल्यावर काम बंद झाले.
कडवई बाजारपेठ ते गुरववाडी पूल येथील सुमारे २५० मीटर रस्ता व तुरळ फाटा ते कडवई येथील पूल या दरम्यान १०० मीटर रस्ता येथे डांबरीकरण झाले परंतु गटारे काढण्यात आली नाहीत परिणामी पाऊस वाढताच पावसाच्या पाण्याने रस्त्याची खडी व साईड पट्टीचा भराव वाहून चालला असून हे चिखल मिश्रित पाणी रस्त्यावरून वाहत आहे.या पाण्यामुळे रस्त्याला नदीचे रूप प्राप्त होते. अश्या पाण्यात गाड्या चालविताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. यामध्ये काही दुचाकीस्वार घसरून पडले आहेत. खडी निघाल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देऊन भूमीगत पक्क्या गटारांची व्यवस्था करावी अशी ग्रामस्थ व नागरिकांची मागणी आहे.