(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे सोनगिरी, मुचरी व मौजे असुर्डे या गावातील ग्रामपंचायतीमध्ये गैरव्यवहार व अनियमितता झाल्याचा आरोप युवा एकता या सामाजिक संस्थेने केला होता. या प्रकरणी देवरूख संगमेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे गेल्या वर्षभरापासून तक्रार दाखल करण्यात आली होती. परंतु त्यांनी अद्याप सदर तक्रारीवर शासकीय नियमानुसार संबंधितावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याने युवा एकता या सामाजिक संस्थेने उपोषणाचे हत्यार उपसले आहे. गटविकास अधिकारी तक्रारीची दखल घेत नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली, परंतु ते देखील शासकीय नियमानुसार तक्रारीची दखल घेण्यास सतत टाळटाळ करत आहेत तसेच विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने स्मरणपत्र काढून देखील कोणतीही कारवाई होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
रत्नागिरी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या प्रकरणी त्यांनी विनंती केली आहे की, या प्रकरणातील दोषींना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात यावे. लोकशाही असलेल्या या संघराज्याच्या नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी ग्रामविकास विभागाच्या शासकीय नियमानुसार त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी त्यांनी संस्थेमार्फत केली आहे. मागील एक वर्षापासून स्थानिक नागरिक यासाठी शासन दरबारी पत्रव्यवहार करत असून त्यावर अद्याप कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आज दिनांक ०९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून पंचायत समिती देवरूख या ठिकाणी तिन्ही ग्रामपंचायतच्या नागरिकांकडून अर्धनग्न स्वरूपात बेमुदत आमरण उपोषणाची हाक देण्यात आली आहे.