(बरेली)
माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांची पत्नी लुईस खुर्शीद यांच्या विरोधात आमदार-खासदारांसाठी असलेल्या विशेष न्यायालयाने अटक वॉरंट जारी केला. सरकारी निधीचा गैरवापर केल्याच्या प्रकरणात हा वॉरंट राजी करण्यात आला.
विशेष न्यायालयाच्या मुख्य न्यायदंडाधिकारी शांभवी यांनी लुईस खुर्शीद यांच्यासह दोन जणांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केला आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 फेब्रुवारी रोजी ठेवली. जिल्ह्यातील भोजीपुरा परिसरात असलेल्या लुईस यांच्या डॉ. झाकीर हुसेन मेमोरियल ट्रस्टद्वारे दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव आणि साहित्या वाटपाचा कार्यक‘म 2009-10 मध्ये आयोजित केला होता, अशी माहिती विशेष सरकारी वकील अचिन्त्या द्विवेदी यांनी गुरुवारी दिली. या वाटपात अनियमितता असल्याचा आरोप झाल्यानंतर सरकारने या प्रकरणाची चौकशी केली.
कार्यक्रमात खोटे शिक्के आणि स्वाक्षर्यांचा वापर करून सरकारी निधीचा गैरवापर करण्यात आल्याचे चौकशीत समोर आले. या प्रकरणी 2017 मध्ये भोजीपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाच्या एफआयआरमध्ये लुईस खुर्शीद आणि संस्थेचा सचिव मोहम्मद अथर फारुकीची नावे होती. पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर न्यायालयाने अनेकवेळा समन्स बजावला. परंतु, आरोपी हजर झाले नाही किंवा त्यांनी जामीनही मिळवला नाही.