राजस्थानमध्ये एक संतापजनक आणि घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. एकाचवेळी २० महिलांवर सामूहिक बलात्काराचा प्रकार समोर आला आहे. यापैकी एका महिलेने पोलिसांत धाव घेतल्याने हे प्रकरण बाहेर आले आहे. सिरोही नगर परिषदेच्या सभापती आणि तत्कालीन आयुक्तांविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंगणवाडीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून सुमारे २० महिलांवर सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार आता उघडकीस आला आहे. पाली जिल्ह्यातील एका पीडितेने तक्रार दिली आहे.राजस्थानमधील सिरोही नगरपरिषदेचे अध्यक्ष महेंद्र मेवाडा आणि माजी नगरपरिषदेचे आयुक्त महेंद्र चौधरी यांच्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंगणवाडी सेविका बनवण्याच्या नावाखाली सभापती महेंद्र मेवाडा आणि तत्कालीन आयुक्त महेंद्र चौधरी यांनी तक्रारदार महिलेसह १५ ते २० महिलांना बोलविले होते. त्यांना खायच्या पदार्थातून गुंगीचे औषध देण्यात आले. यानंतर मेवाडा आणि चौधरी यांच्यासह त्यांच्या सहका-यांनी या महिलांवर गँगरेप केला, या महिलांचा व्हीडीओ काढून त्यांना ब्लॅकमेलही करण्यात येत असल्याचा आरोप या पीडित महिलेने केला आहे. दोन-तीन महिन्यांपूर्वी ही महिला अंगणवाडीत काम करण्यासाठी तिच्या सहकारी महिलांसोबत सिरोही येथे आली होती. नोकरी मिळविण्यासाठी त्यांनी त्यांनी अध्यक्ष आणि आयुक्तांची भेट घेतली होती. या दोघांनी त्यांच्या ओळखीने एका घरात राहण्याची आणि जेवणाची सोय केली. या जेवणात त्यांना गुंगीचे औषध देण्यात आले होते. महिला बेशुद्ध झाल्यावर त्यांच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप या महिलेने केला आहे. आरोपींनी लैंगिक अत्याचाराचे मोबाईल फोनमध्ये चित्रीकरणही केले. यानंतर हे फुटेज सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची मागणीही केली.
पीडित महिलेने प्रथम पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी गेली. मात्र तिची तक्रार दाखल करुन घेण्यास नकार देण्यात आला. काही दिवसांनी तिला आपल्या प्रमाणे आणखी १९ महिलांचे लैंगिक शोषण झाल्याची माहिती मिळाली. सर्व महिलांनी न्यायालयात धाव घेतली. राजस्थान उच्च न्यायालयाने आता आठ महिलांच्या याचिकेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
या प्रकरणाचा तपास करत असलेले जिल्हा पोलीस अधीक्षक पारस चौधरी यांनी सांगितले की, “काही काळापूर्वी या महिलांनी सिरोही महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र चौकशीत ही तक्रार खोटी असल्याचे समोर आले आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने ८ महिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसारयाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.”