जेव्हा शरीर तुम्हाला साथ देत नाही आणि तुम्हाला आवश्यक गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते, तेव्हा पेन्शन तुमच्या सर्व समस्यांवर उपाय ठरू शकते. जर तुम्ही तरुण असाल तर दर महिन्याला थोडी थोडी रक्कम जमा करून तुम्ही तुमचे वृद्धापकाळ आर्थिकदृष्ट्या संपन्न करू शकता आणि तुम्हाला कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही.
- कमी गुंतवणुकीत खात्रीशीर पेन्शन मिळवायचे असेल तर अटल पेन्शन योजना एक चांगला पर्याय आहे.
- या योजनेंतर्गत छोटी गुंतवणूक करून तुम्हाला खात्रीशीर पेन्शन मिळू शकते.
- सरकारने २०१५-१६ मध्ये अटल पेन्शन योजना सुरू केली होती.
एपीवाय (APY) योजनेतील गुंतवणुकीवर मिळणार पेन्शन
अटल पेन्शन योजनेमुळे तुम्हाला वृद्धापकाळात आर्थिक आधार मिळू शकतो. ही एक पेन्शन योजना असून सरकार स्वतः पेन्शनची हमी देते. तुम्ही या योजनेत दररोज थोडी बचत करून गुंतवणूक करू शकता आणि तुमच्या गुंतवणुकीवर अवलंबून तुम्हाला 1,000 ते 5,000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते. या योजनेत गुंतवणुकीची वयोमर्यादा १८ ते ४० वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
अशा प्रकारे तुम्हाला दरमहा 5000 रुपये पेन्शन मिळेल
या योजनेअंतर्गत पेन्शन मिळवण्यासाठी किमान २० वर्षे गुंतवणूक करणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही 40 वर्षांचे असाल आणि तरीही त्यात गुंतवणूक करायला सुरुवात केली, तर तुम्ही ६० वर्षांचे झाल्यावर तुम्हाला पेन्शन मिळू लागेल. पेन्शनची गणना समजून घेण्यासाठी, समजा तुमचे वय १८ वर्षे आहे, तर या योजनेत दरमहा २१० रुपये जमा करून, म्हणजे फक्त ७ रुपये प्रतिदिन, तुम्हाला ६० नंतर दरमहा ५००० रुपये पेन्शन मिळू शकते. जर तुम्हाला 1,००० रुपये पेन्शन हवी असेल तर या वयात तुम्हाला दरमहा फक्त ४२ रुपये जमा करावे लागतील.
दरम्यान, अटल पेन्शन योजनेत सामील होऊन, पती-पत्नी दोघेही दरमहा १०,००० रुपयांपर्यंत पेन्शन मिळवू शकता. तसेच जर पतीचा ६० वर्षापूर्वी मृत्यू झाला तर पत्नीला पेन्शनची सुविधा मिळेल. पती आणि पत्नी दोघांच्या मृत्यूनंतर, नॉमिनीला संपूर्ण पैसे परत मिळतील. अटल पेन्शन योजना ही सेवानिवृत्ती योजना म्हणून खूप लोकप्रिय आहे. अलीकडेच या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येनेही पाच कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
या योजनेत तुम्ही दररोज 7 रुपये जमा केल्यास तुम्हाला दरमहा 5000 रुपये पेन्शन मिळू शकते. त्याचवेळी, जर तुम्ही दरमहा 42 रुपये जमा केले तर तुम्हाला 1000 रुपये मासिक पेन्शन मिळेल. तुम्हाला 2000 रुपये पेन्शन हवी असेल तर तुम्हाला 84 रुपये गुंतवावे लागतील. जर तुम्हाला मासिक 3000 रुपये पेन्शन हवी असेल तर तुम्हाला मासिक 126 रुपये गुंतवावे लागतील. तुम्हाला मासिक 4000 रुपये पेन्शन मिळवायची असेल तर तुम्हाला दरमहा 168 रुपये जमा करावे लागतील.
कर लाभ
या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, यामध्ये मिळणारा कर लाभ. अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना आयकर कायदा 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतचा कर लाभ मिळतो. वास्तविक, यातून करपात्र उत्पन्न वजा केले जाते. याशिवाय, काही प्रकरणांमध्ये 50,000 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त कर लाभ मिळतो. म्हणजेच या योजनेत एकूण 2 लाख रुपयांपर्यंतची वजावट उपलब्ध आहे.
या योजनेची तरतूद
या योजनेंतर्गत एखाद्या गुंतवणूकदाराचा 60 वर्षापूर्वी मृत्यू झाल्यास त्याची पत्नी/पती या योजनेत पैसे जमा करणे सुरु ठेवू शकतात आणि 60 वर्षांनंतर दरमहा पेन्शन मिळवू शकतात. दुसरीकडे, असाही पर्याय आहे की, त्या व्यक्तीची पत्नी तिच्या पतीच्या मृत्यूनंतर एकरकमी रकमेवर दावा करु शकते. जर पत्नीचाही मृत्यू झाला तर तिच्या नॉमिनीला एकरकमी रक्कम मिळते.