( रत्नागिरी )
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता श्रीमती वैदेही रानडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैदेही रानडे या सहव्यवस्थापकीय संचालक, MSRDC, मुंबई येथे कार्यरत होत्या. त्यांना आता जिल्हा परिषद, रत्नागिरी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
वैदही रानडे यांनी रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी अशा विविध पदांवर काम केलेले आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील त्यांना माहिती आहे. पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीमध्येही त्यांनी नियोजनबध्द काम केले होते. त्यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाल्यामुळे निश्चितच चांगला फायदा होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निवासी जिल्हाधिकारी असताना २००५ मध्ये महापुराची स्थिती निर्माण झाली होती. पूर पाहणीसाठी जिल्हाधिकारी खेडमध्ये तर अप्पर जिल्हाधिकारी चिपळूणमध्ये अडकून पडले होते. त्या प्रसंगी मुख्यालयाच्या ठिकाणी प्रशासकीय जबाबदारी स्वीकारून महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ वैदेही रानडे यांच्यावर आली होती, ती जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली होती.
आपत्कालीन परिस्थितीत भारतीय सैन्य दलाशी समन्वय साधण्यापासून ते नागरिकांना धीर देण्यापर्यंतच्या सर्व जबाबदाऱ्या रानडे यांनी हिमतीने पेलल्या आहेत. पुनर्वसन अधिकारी म्हणून वैतरणा, कोयना धरणग्रस्तांचे पुनर्वसन करताना प्रशासन आणि विस्थापितांमधील महत्त्वाचा दुवा म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.