(दापोली)
जिल्हा परिषद रत्नागिरी येथील शिक्षणसेवक नियुक्ती प्रक्रियेची स्थगिती उठवून नियुक्ती द्या, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. या वेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा, करण सुळे, कृष्णा ठाकरे, लहू सनेर, तुळशीराम भील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी यांच्या १८ मार्चच्या पत्रानुसार, शिक्षणसेवक नियुक्तीला स्थगिती दिली आहे व वरिष्ठ कार्यालयाकडे मार्गदर्शन मागितले आहे, असे संबंधित शिक्षणसेवक यांना कळवले आहे. शिक्षणसेवकांना मुलाखत ठिकाणी बोलावल्याने नाहक त्रास झाला. आज, उद्या नियुक्ती देतो म्हणून विद्यार्थ्यांना विनाकारण थांबवण्यात आले.
शिक्षणसेवक यांना नियुक्तीपत्र दिले असते तरी काही अडचण निर्माण झाली नसती. निवडणूक आयोगाचे पत्र समोर करून शिक्षणाधिकारी यांनी जाणीवपूर्वक शिक्षणसेवकांना नियुक्तीपत्र देण्यात दिरंगाई केली. शिक्षणसेवक नियुक्तीला स्थगिती देऊन शिक्षणसेवकांच्या सेवा देण्यापासून वंचित ठेवले आहे. नियुक्तीबाबत दिरंगाई केल्यामुळे शिक्षणसेवकांवर अन्याय होत आहे. त्यामुळे शिक्षणसेवक नियुक्तीबाबतची प्रक्रिया तत्काळ राबवण्यात यावी अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी, असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून शासनास देण्यात आला आहे.