(संगमेश्वर / एजाज पटेल)
राज्य सुरक्षा दलाचा जवान असलेला अनिकेत कदम हा 21 नोव्हेंबर रोजी ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक 9-10 वर कर्तव्यावर असतानाचे दरम्यान, एका महिलेने प्रवाशाची पर्स चोरून पळ काढण्यास सुरुवात केली. यावेळी प्रवाशी जनतेतून आरडाओरड सुरु झाला. महिला सुसाट धावत सुटलीय म्हणजे काहीतरी गडबड आहे. हे अनिकेतच्या लक्षात येताच त्याने आपले काही बारवाईट होईल याची पर्वा न करता त्या महिलेच्या मागे धावून तिला पकडले.
जैनबने अनिकेतच्या तावडीतून स्वतःची सुटका करण्यासाठी सोबत ठेवलेल्या धारदार शस्त्राने अनिकेतच्या कमरेवर वार केले. या घटनेत अनिकेतचा गणवेश फाटला आणि दुखापतीमुळे रक्तस्त्राव सुरु झाला. तरीही मागे न हटता रक्तबंबाळ अवस्थेतच अनिकेतने महिला कॉन्स्टेबल वनिता राठोडच्या मदतीने जैनब पठाण उर्फ जैनब मेमनाला ताब्यात घेत रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. रेल्वे पोलिसांनी जैनबविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी जैनब पठाण उर्फ जैनब मेमनला पकडण्यात आले आहे, तर तिचा पती जाहिद इरफान शेख फरार झाला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी रेल्वे पोलिसांनी त्यालाही पकडले. गौतम नगर, गोवंडी, मुंबई येथे राहणारी २५ वर्षीय जैनब पठाण उर्फ जैनब मेमन हिच्याविरुद्ध दादर, कुर्ला, वडाळा रेल्वे पोलिसांत चोरीचे ३० गुन्हे तर तिच्या पतीविरुद्ध ४ गुन्हे दाखल आहेत.
या कामगिरीबद्दल आरपीएफ विभागीय वरिष्ठ डीएसी ऋषी कुमार शुक्ला यांनी अनिकेत कदम यांचा सन्मानपत्र देऊन गौरव केला. अनिकेत कदम हा चिपळूण तालुक्यातील निवळी येथील अनंत दगडू कदम यांचा सुपुत्र असून त्याने केलेल्या कामगिरीमुळे चिपळूण तालुक्याचे व निवळी गावाचे नाव लौकिक करणाऱ्या अनेकेतचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव प्रत्यक्ष भेटून तसेच व्हाट्सअप, फेसबुक, इन्स्ट्राग्राम आदी सोशल माध्यमाद्वारे केले जात आहे. अनिकेत याला प्रदान करण्यात आलेल्या सन्मानपत्र स्वीकारतानाचे व्हाट्सअँप स्टेटस ठेवून अनेकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.