(चिपळूण)
एक फोन आला आणि त्यावर झालेल्या संभाषणानंतर १९ वर्षीय युवकाने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना २६ जानेवारी रोजी रात्री शहरातील भोगाळे येथील परशुराम प्लाझा इमारतीमध्ये घडली आहे. रोहन दुर्योधन नेताम (१९, रा. जि. गोंदिया) असे या युवकाचे नाव आहे.
रोहन आणि त्याचा मित्र परशुराम प्लाझा येथे राहत होते. रोहन चिपळूणमध्ये नोकरीला होता. इमारत बांधकामात मजुरीचे काम तो करत असे. २६ जानेवारीला रात्री रोहन आणि त्याचा मित्र रूममध्ये बसले होते, त्यावेळी रोहनला कोणाचा तरी फोन आला. फोनवर झालेल्या संभाषणानंतर त्याने आपला मोबाइल लादीवर जोराने आपटला आणि रागाच्या भरात बाल्कनीमध्ये जाऊन तिसऱ्या मजल्यावरून थेट उडी मारली. तो तेथेच गतप्राण झाला.
या घटनेनंतर परिसरातील नागरिक गोळा झाले. तत्काळ चिपळूण पोलिसांना त्याची खबर देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ त्याला रुग्णालयात हलविले. मात्र, तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. याप्रकरणी चिपळूण पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. त्याला आलेला फोन कोणाचा होता आणि त्यावर असे काय संभाषण झाले की ज्यामुळे त्याने रागाने आत्महत्या केली, याचा तपास पोलिस करत आहेत. मोबाईलचे रेकॉर्ड हाती आल्यावर त्याने आत्महत्या का केली ते स्पष्ट होणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.