( रत्नागिरी /प्रतिनिधी )
जिल्हा शासकीय रुग्णालयात चोवीस तास ठाण मांडून सेवा देणारे स्त्री रोग विशेषज्ञ (Gynecologist), M.S. डॉक्टर विनोद सांगवीकर आणि त्यांचे सहकाऱ्यांमुळे जिल्हा रूग्णालयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. रुग्णालयात डॉक्टरांची संख्या कमी आहे. मात्र तरीही मोठ्या धाडसाने डॉक्टर सांगवीकर यांनी शासकीय रुग्णालयाचा पदभार स्वीकारला आहे. सद्यस्थितीत रुग्णालयातील उपचारपद्घतीत विविध सुधारणा झालेल्या दिसून येत आहेत. अशातच एका कर्मचाऱ्याने गरोदर महिलेला रक्तदान करत त्या महिलेचा जीव वाचवला आहे. डॉक्टर सांगवीकर यांच्या माध्यमातून रूग्णालयातील उपचारपद्घतीमुळे नकारात्मतेकडून सकारात्मकतेकडे प्रवास सुरू झाला आहे.
नोकरी स्वीकारल्यानंतर रुग्णांची सेवा करीत असतानाच रुग्णसेवेचे गांभीर्य ओळखून कर्मचारी नरेश जोशी यांनी मोठे औदार्य दाखवले. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रसुती विभागात एक गरोदर महिला प्रसुतीसाठी दाखल झाली होती. उपचारादरम्यान तिला ओ निगेटीव्ह रक्ताची आवश्यकता होती. जिल्हा रुग्णालयासह रेडक्रॉस या खाजगी रक्तपेढीतही या गटाचे रक्त उपलब्ध नव्हते. त्यानंतर रुग्णालयासह नातेवाईकांसह ओ निगेटीव्ह रक्त असलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु तालुक्याच्या बाहेरून आलेल्या या महिलेच्या कुटुंबियांची रत्नागिरी शहरात फारशी ओळख नव्हती. त्यामुळे महिलेसाठी रक्त आणायचे कुठून? या विवंचनेत कुटुंबीय होते.
जिल्हा रुग्णालयात अपघात विभागात काम करणारे कर्मचारी नरेश जोशी यांना या घटनेची माहिती एका कर्मचाऱ्याने दिली. त्यांचाही रक्त गट ओ निगेटीव्ह असल्याने त्यांनी तात्काळ कुटुंबियांचा शोध घेत आपण रक्तदान करण्यास तयार असल्याचे सांगितले. जोशी यांनी रेडक्रॉस रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले. कर्मचारी नरेश जोशी यांनी तात्काळ रक्तदान केल्यामुळे त्या महिलेला रक्त उपलब्ध झाले. जिल्हा रुग्णालयात सेवा बजावत असताना रक्तदान करून महिलेचे प्राण वाचवणाऱ्या नरेश जोशी यांच्यासह चोवीस तास सेवा देणाऱ्या डॉक्टरांचे ही सर्वत्र कौतुक होत आहे.