(संगमेश्वर)
गणेशोत्सवात घरांमध्ये विविध प्रकारचे देखावे साकारले जातात. त्यातील काही देखावे विविध संदेश देणारे असतात, तर काही जुन्या आठवणींना उजाळा देणारे असतात. असाच एक देखावा संगमेश्वर येथील खातू कुटुंबियांनी साकारत लोकमान्य टिळकांना अभिवादन केले आहे.
अभिषेक खातू हे व्यवसायाने छायाचित्रकार आहेत. यांनी आपल्या दोन बंधूंना सोबत घेऊन पुणे येथील लोकमान्य टिळकांच्या केसरीवाड्याची हुबेहूब प्रतिकृती घरच्या गणपतीच्या सजावटीसाठी साकारली आहे. प्रतिकृतीचे खास वैशिष्ट्य म्हणजे केवळ पुठ्ठा आणि कागद वापरून इकोफ्रेंडली सजावट करण्याचा प्रयत्न तीन भावंडांनी केला आहे. महत्वाचे म्हणजे खातू कुटुंबियांचा बाप्पा सुध्दा शाडूच्या मातीपासून बनविलेला आहे.
या संदर्भात अभिषेक खातू यांनी सांगितले की, हा देखावा म्हणजे लोकमान्य टिळकांना आदरांजली आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ केला म्हणून त्यांना आमच्याकडून आदरांजली म्हणून केसरीवाडा साकारावा अशी इच्छा आमच्या तीन भावांच्या मनात आली. हा देखावा तयार होण्यासाठी एक महिना लागला. ही प्रतिकृती तीन फूट उंच आणि आठ फूट लांब आहे. यामध्ये टिळकवाड्याचे तीन मजले दाखवण्यात आले आहेत. वाड्याच्या विविध खोल्यांमध्ये वावरणारी माणसेही या तीन भावंडांनी दाखवली आहेत. त्यासाठी त्यांनी लहान- लहान मूर्ती साकारुन त्या विविध खोल्यांमध्ये बसविल्या आहेत. या मूर्तीसुध्दा शाडूच्या मातीपासून तयार करण्यात आलेल्या आहेत. २२ मूर्ती हे देखाव्याचे मुख्य आकर्षण म्हणावे लागेल. या मूर्ती सुध्दा या तीन भावंडांनी केल्या आहेत.
मुख्य गणेशमूर्ती आणि संपूर्ण देखावा हा इकोफ्रेंडली आहे. हा देखावा पाहण्यासाठी अनंत चतुर्दशीपर्यंत येऊ शकता, असा संदेश या तीन भावंडांनी दिला आहे.