(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर शहर परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून बिबट्याचे प्रत्यक्षात काहींना दर्शन झाल्याची चर्चा सुद्धा सुरु आहे. या बिबट्याची भटकंती संभाजीनगरपर्यंत सुरु असून जनावरांच्या रक्ताला चटावलेल्या बिबट्याने येथील दादू कुष्टे यांच्या पाळीव कुत्र्यावर झडप मारली, मात्र यात तो यशस्वी न झाल्याने कुत्रा बचावला असला तरी या झटापटीत कुत्रा जखमी झाला आहे.
गेले काही दिवस बिबट्या शहरासह लोकवस्तीच्या ठिकाणी सैरवैर भटकंती करत असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. मुक्या जनावरांच्या रक्ताला चटावलेल्या बिबट्याची भक्ष्य शोधार्थ भटकंती शहरी भागासह लोकवस्तीच्या ठिकाणी सुरु असून शहरातील वाढलेल्या श्वानांची संख्या पूर्वीपेक्षा कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ते बिबट्याचे शिकार झाले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
काही वाहनचालकांना शहरातील अंतर्गत रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाल्याची चर्चा सर्वत्र पसरल्याने वाहनचालक भयभीत झाले असून बिबट्याच्या भीतीमुळे रात्रीची वाहन वर्दळ सुद्धा रोडावली आहे. यापूर्वी वनभाग सोडून भररस्त्यात तसेच गाव वाडीच्या ठिकाणी बिबट्याचे मुक्त संचार सुरु असल्याचेच नव्हे तर अनेकांना दर्शन झाल्याचे ऐकीवात होते. मात्र आता गजबजलेल्या शहरीभागातही बिबट्याने एन्ट्री मारली आहे.
दोनच दिवसापूर्वी संभाजी नगर येथील दादू कुष्टे यांच्या घराजवळ साखळीने बांधून ठेवलेल्या कुत्र्याची शिकार करण्यासाठी बिबटयाने त्याच्यावर झडप घातली. मात्र या तावडीतून कुत्र्याने आपली सुटका करून घेतली असली तरी बिबटयाच्या तावडीतून सुटण्याच्या धडपडीत कुत्र्याच्या जीवावरचे जखमेवर निभावले आहे. मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गच्या एका बाजूला संगमेश्वर शहर तर दुसऱ्या बाजूला टेकडीवर संभाजीनगर ही लोकवस्ती असून राष्ट्रीय महामार्ग ओलांडून बिबट्याचा वावर दोन्ही ठिकाणी असावा असा समज असून संगमेश्वरवासीय तसेच वाहन चालक बिबटयाच्या दहशतीखाली वावरत आहेत. वनविभागाने यामध्ये लक्ष घालून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.