(रत्नागिरी)
शहरातील भटक्या कुत्र्यांना अन्न घालण्यासाठी जाणाऱ्या प्रौढाला शेजाऱ्याने मारहाण केली. ही मारहाण केल्याप्रकरणी संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
सदर घटना बुधवारी (ता. १७) दुपारी रहाटाघर येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णकांत दत्ताराम वर्तक (वय ५१, रा. रहाटाघर, रत्नागिरी) हे बुधवारी दुपारी नेहमीप्रमाणे घरातील उरलेले अन्न डब्यात भरून कुत्र्यांना घालण्यासाठी रूमच्या बाहेर आले असता त्यांच्या शेजारच्या रूममध्ये राहणाऱ्याने त्यांना मारहाण केली. या प्रकरणी कृष्णकांत वर्तक यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.