(रत्नागिरी)
अज्ञात कारणातून जुन्या घरी गळफास घेत प्रौढाने आत्महत्या केल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील वळके येथे बुधवारी दुपारी घडली. रवींद्र मधुकर सावंत (५६, रा. वळके, मराठवाडी) असे त्यांचे नाव आहे.
रवींद्र सावंत हे बुधवारी दुपारी घरामध्ये जेवण झाल्यानंतर मी जुन्या घरी जातो, असे आपल्या कुटुंबीयांना सांगून घराबाहेर पडले होते. परंतु, बराच वेळ झाला तरीही ते परत न आल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी जुन्या घरी जाऊन पाहिले. त्यावेळी रवींद्र सावंत हे जुन्या घराच्या लाकडी वाशाला नायलॉन दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत दिसले.
नातेवाइकांनी त्यांच्या गळ्यातील रस्सी काढून त्यांना पाली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.