(सिंधुदुर्ग)
मुंबई गोवा महामार्गावर सिंधुदुर्गातील नांदगाव-ओटव फाटा येथे एसटी बसचा भीषण अपघात झाला. सदर एसटी बस पुणे ते सिंधुदुर्ग अशा मार्गावर विद्यार्थ्यांची सहल घेऊन निघाली होती. चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने नांदगाव ओटव फाटा येथील ब्रिजवर असलेल्या डिव्हायडरच्या संरक्षक कठड्याला आदळून भीषण अपघात घडला. ही अपघात घटना मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली. या अपघाताची भीषणता एवढी होती की, मध्यरात्री गाढ झोपेत असताना स्थानिकांना दोन वाजता मोठा आवाज झाला. सुदैवाने बसमधील विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या. अपघातातील जखमींना तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले. या अपघातात एस टी बसचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
महामार्गाच्या बाजूला नांदगाव पोलीस पाटील सौ. मोरजकर यांचे घर असल्याने त्यांना तो आवाज आला. त्यांनी याबाबत तातडीने मदत मिळण्यासाठी बाजूलाच असलेले भूपेश मोरजकर यांना संपर्क साधून याबाबत माहिती दिली. या अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली असून या ठिकाणी नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांच्यासह भुपेश मोरजकर, केदार खोत, प्रभाकर म्हसकर, दिक्षा मोरजकर आदींनी तातडीने मदतकार्य केले. तसेच त्यांना तात्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले आहे.